MPSC पास दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांकडून महत्वाचे अपडेट, काय दिली नवीन माहिती

| Updated on: Jul 13, 2023 | 12:18 PM

Pune Darshana Pawar : पुणे येथील MPSC परीक्षा पास दर्शना पवार हिचा मृत्यूबाबत आता नवीन खुलासा समोर आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणात नवीन माहिती दिली आहे. या प्रकरणात राहुल हंडोरे याला अटक केली गेली होती.

MPSC पास दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांकडून महत्वाचे अपडेट, काय दिली नवीन माहिती
Darshana Pawar
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

पुणे : पुणे शहरातील दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी १८ जून रोजी तिची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला होता. दर्शना पवार हिचा कुजलेला मृतदेह पोलिसांना सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी त्याचवेळी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. पोलिसांच्या या भूमिकेला पोस्टमॉर्टम अहवालातून अधिक सबळ पुरावा मिळाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत राहुल हंडोरे याला अटक केली. आता या प्रकरणात पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे.

काय होते प्रकरण

पुणे शहरात एमपीएससी परीक्षेची तयारी करणारी दर्शना पवार वनअधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली. ती वनअधिकारी होणार होती. त्यासाठी तिचा अनेक ठिकाणी सत्कार केला जात होता. तिच्यासोबत राहुल हंडोरे हा तिचा मित्रही परीक्षेची तयारी करत होता. परंतु त्याला यश आले नाही. राहुल हंडोरे याला दर्शना पवार हिच्याशी लग्न करायचे होते. परंतु दर्शना पवार लग्नासाठी तयार नव्हती.

मग राहुल याने केली हत्या

दर्शना पवार हिला लग्नासंदर्भात विचारणा केल्यानंतर ती राहुल याला नकार देत होती. यामुळे राहुल याने तिला राजगडावर ट्रेकसाठी येण्याचा आग्रह केला. १२ जून रोजी दोन्ही जण राजगडावर पोहचले. त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून ही बाब स्पष्ट झाली. दोघांनी एकत्र गड चढण्यास सुरुवात केली. परंतु काही तासानंतर राहुल हंडोरे एकटाच परत आला. यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय होता.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी केला शोध सुरु

राजगडावर पुन्हा राहुल यांने दर्शनाकडे लग्नाचा विषय काढला. दर्शना पवार हिने नकार दिला. त्यानंतर राहुल याने तिची हत्या केली. दर्शना पवार हिची हत्या करुन राहुल हंडोरे फरार झाला होता. तो पश्चिम बंगाल, गोवा या ठिकाणी गेला होता. २२ जून रोजी तो मुंबईत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याला अंधेरी रेल्वेस्थानकावर अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात त्याची कसून चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी काय दिले अपडेट

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असल्याची माहिती आता दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहुल हंडोरे यांची गाडी आणि ज्या ब्लेडने दर्शनाची हत्या झाली तो ब्लेडही जप्त केला आहे. राहुल यानेही प्रेम प्रकरणातून दर्शनाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.