Pooja Khedkar : पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना नोटीस, कारण काय?
प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या वादात सापडल्या आहेत. त्यांची ट्रेनिंग मध्येच रद्द करण्यात आली आहे. दुसरीकडे त्यांचे आई-वडील देखील वादात सापडले आहे. पूजा खेडकर यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.
पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. उद्या पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे पुणे पोलिसांचे आदेश आहेत. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. याच बाबतीत वाशीम पोलिसांनी खेडकर यांची स्टेटमेंट नोंदवली होती. ही स्टेटमेंट आता पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली होती. याच चौकशीसाठी पूजा खेडकर यांना हजर राहण्यासाठी पुणे पोलिसांनी नोटीस दिली आहे.
वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांची वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी भेट घेतली होती. मी माझ्या कामासाठी आले आहे मी बोलू शकत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. दोन दिवसांपूर्वी तीन महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली होती. पूजा खेडकर यांनी आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस चौकशीसाठी आले होते.
बडतर्फ करण्याची मागणी
आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी म्हटले की, पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण जरी थांबवले असले तरी ही कारवाई पुरेशी नाही. त्यांना बडतर्फ करण्याची गरज आहे. शिवाय त्यांनी ज्या पद्धतीने बनवा बनवी केली त्यावरून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. दिव्यांग प्रमाणपत्र असतांना त्यांनी पुन्हा दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. पूजा खेडकर यांचे आई वडील सध्या जामीन मिळण्याच्या प्रयत्नात आहेत.
ग्रामस्थांचा खेडकर कुटुंबाला पाठिंबा
वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर ह्या अहमदनगर जिल्ह्यातील भालगाव या गावाच्या रहिवासी आहेत. त्यांच्या आई मनोरमा खेडकर या गावच्या माजी सरपंच आहेत. तर वडील दिलीप खेडकर नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभा निवडणुकीत उभे होते. मात्र खेडकर कुटुंबावर जाणीवपूर्वक आरोप करून त्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे असे ग्रामस्थ सांगत आहेत. खेडकर कुटुंबांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असं त्यांनी म्हटले आहे. शिवाय ग्रामस्थांचे एक मंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या भेटीला जाणार आहेत. दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीला उभे होते, त्याच मुळे त्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
काही महिलांना तर अश्रू अनावर झाले. मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल काढलेला व्हिडिओ दाखविण्यात येतो मात्र त्यापूर्वी त्यांच्यावर काठ्या आणि चाकू उगारण्यात आला होता. त्याचा व्हिडिओ मात्र दाखविण्यात येत नाही. दोन्ही गटाची पारदर्शक चौकशी करून न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. तसा ठराव देखील ग्रामपंचायतने सर्वानुमते पारित केला आहे.
अतिक्रमण हटवले
दरम्यान खेडकर कुटुंबियांनी बंगल्याबाहेर असणारे अतिक्रमण स्वतःहून काढून टाकले आहे. महानगरपालिकेने नोटीस दिल्यानंतर खेडकर कुटुंबियांच्या कामगारांनी अतिक्रमणाचा भाग काढला आहे. पूजा खेडकर यांचा पुण्यातील बाणेर परिसरात आलिशान बंगला आहे. बंगल्याच्या बाहेर भिंतीला लागून अतिक्रमण करण्यात आले होते. यासंदर्भात अतिक्रमण काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने खेडकर कुटुंबियांना नोटीस बजावून सात दिवसांची मुदत दिली होती.