प्रकाश आंबेडकर यांच्या ‘या’ विधानाने ठाकरे गटाची डोकेदुखी?; म्हणाले, एकनाथ शिंदे यांची शिवसेना…
आम्ही आजही महाविकास आघाडीचे घटक नाही. आम्हाला फक्त चर्चेसाठी बोलावले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वंचितचे 42 उमेदवार तयार आहेत. आताच आम्ही नावे जाहीर करणार नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले. भाजप आम्हाला तर लोकसभेच्या 120 जागा द्यायला तयार आहे, असं मिश्किल विधान त्यांनी एका प्रश्नावर बोलताना केलं. तसेच सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपमध्ये जावं, असा सल्लाही दिला.

संदीप शिंदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सोलापूर | 28 जानेवारी 2024 : मराठा समाजाचे नेते झोपले होते. या सर्व नेत्यांना बाजूला ढकलून एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे हिरो ठरले आहेत. त्यांच्याबद्दल मराठा समाजात सहानुभूती वाढली आहे. आता एकनाथ शिंदेच स्ट्राँग मराठा लीडर झाले असून सगळ्यांना त्यांनी क्लिन बोल्ड केले आहे, असं सांगतानाच एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढली पाहिजे, असं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आंबेडकर महाविकास आघाडीत जाणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी शिंदे यांचं कौतुक केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर, आंबेडकर यांच्या या विधानाने ठाकरे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. मराठा समाजातील नेते झोपले आहेत. मराठा समाजातील जनतेला मराठा नेत्यांबद्दल चिड तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सहानुभूती दिसते आहे. मराठा समाजाने मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात ज्या मागण्या केल्या त्या मान्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आता स्ट्राँग मराठा लीडर म्हणून पुढे आले आहेत. शिंदेच्या भूमिकेमुळे इतर मराठा नेते हे क्लीन बोल्ड झाले आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
एकनाथ शिंदेंना फायदा होईल
मराठा समाजाच्या इतर नेत्यांना बाजूला सारून एकनाथ शिंदे हे सगळ्या मराठा नेत्यांच्या पुढे गेले आहेत. एकनाथ शिंदे हे धाडसी आणि चांगला माणूस आहे, अशी सहानुभूती समाजात निर्माण झाली आहे, असं सांगतानाच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील या निर्णयामुळे भाजपचं मोठं नुकसान होणार आहे. भाजपने एकनाथ शिंदेंना पुढे करून ओबीसी समाजाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यात मराठा समाज आणि ओबीसी समाजाचा फटका भाजपला बसणार आहे. मनोज जरांगे वंचितबाबत सकारात्मक होते. मात्र आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना वाढली पाहिजे. या धाडसी निर्णयाचा शिंदे यांना मोठा फायदा होईल, असं आंबेडकर यांनी म्हटलंय.
दोन समाजात दरी वाढणार
दुसरीकडे ओबीसी आणि मराठा समाजात या निर्णयामुळे दरी वाढली आहे. ओबीसी समाजाचे नेते या विरोधात कोर्टात आणि इतर मार्गाने विरोधात जातील, त्यामुळे दोन्ही समाजात दुरावा निर्माण होऊ शकतो, असं सांगतानाच आम्हाला सत्ता दिल्यावर आम्ही आरक्षणाचा फॉर्म्युला देऊ, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.