पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पुणे शहरातील ‘या’ प्रकल्पांचे उद्घाटन, कधी असणार दौरा?
Pune News : पुणे शहरातील दोन महत्वाचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. या प्रकल्पांचा तांत्रिक सोपस्कार येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कार वितरण समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांनी ही माहिती दिली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील दोन मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्याची तयारी सुरु झाली आहे. पुणे भारतीय जनता पक्षाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच पुणेकरांना दोन महत्वाचे प्रकल्प मिळणार आहे.
काय आहे प्रकल्प
पुणे मेट्रोचा विस्तारित मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. गरवारे ते रूबी हॉल, फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय असा विस्तारित मार्ग आहे. महामेट्रोकडून दोन्ही विस्तारित मार्गांवरील काम पूर्ण करण्यात आले आहे. विस्तारित मार्गांची मेट्रो रेल्वे सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे. आयुक्तांकडून हिरवा कंदील दिल्यानंतर या मार्गांवर सेवासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात पुणे मेट्रोच्या विस्तारीत प्रकल्पाचे उद्गाटन करण्याची तयारी सुरु आहे.
दुसरा प्रकल्प कोणता
पुणे शहरातील चांदणी चौक जुना पूल पाडण्यात आला. या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या नवीन पुलामुळे चांदणी चौकात नेहमी विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत होईल. यामुळे पुणेकरांसाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. हा नवीन पूल कधी सुरु होणार याची वाट पुणे शहरातील नागरीक पाहत आहे. पुणेकरांची ही प्रतिक्षाही संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात या पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने या प्रकल्पासंदर्भात माहिती देताना म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात चांदणी चौकातील पुलाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. भाजप नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात मेट्रो अन् चांदणी चौकातील पुलाचे लोकार्पण पूर्ण होणार असल्याचे म्हटले आहे.