सुनिल थिगळे, राजगुरुनगर, पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघात सोमवारी मध्यरात्री झाला होता. अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पाच महिलांचा मृत्यू झाला होता तर 17 महिला जखमी झाल्या होत्या. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला होता. अखेर या महिलांच्या मुत्यूस कारणीभूत ठरलेला चालक व अपघातग्रस्त वाहन पोलिसांनी पकडले आहे. खेड पोलिसांनी ३६ तासांच्या आत ही कामगिरी केली आहे. कानिपनाथ बबन कड (वय २४ रा. संतोषनगर ,वाकी ता खेड ) असे वाहनचालक आरोपीचे नाव आहे.
कसा झाला अपघात
पुणे नाशिक महामार्गावर खरापुडी फाटाजवळ महिला सोमवारी मध्यरात्री रस्ता ओलंडत होती. त्यावेळी पायी जाणाऱ्या या महिलांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात 5 महिलांचा मृत्यू झाला. तर 17 महिला जखमी झाल्या होत्या. सुशीला देढे, इंदुबाई कोंडीबा कांबळे ( वय ४६) अशी दोन मृत महिलांची नावे असून अन्य मृतांची नावे समजू शकली नाहीत. जखमी महिलांवर खाजगी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
स्वयंपाक करुन घरी जात होत्या
पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी या महिला गेल्या होत्या. काम संपवून त्या महिला घरी जात होत्या. परंतु घरी पोहचण्यापुर्वीच काही महिलांना काळाने गाठले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी केली अटक
महिंद्रा कंपनीच्या कारने या महिलांना रस्ता ओलांडताना धडक दिली होती. धडक दिल्यानंतर चालक वाहन घेऊन फरार झाला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी सुर्दशन पाटील यांचे सुचनेप्रमाणे पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेण्यासाठी ही पथके रवाना केली.
आरोपीचा चारही दिशेकडे शोध घेण्यात आला. अखेरी कानिफनाथ कड हा हेद्रुस (ता खेड ) येथील बच्चेवाडी येथे नातेवाईक देवीदास पाटीलबुबा बच्चे याच्या घराच्या कडेला वाहन लपून बसला होता. सहाय्यक पोलिस निरिक्षक नवनाथ रानगट आणि त्यांचय पथकाने सीसीटीव्ही फुटेजचे आधारे माग काढुन आरोपीला अटक केली आहे.
नागरिकांनी केली मदत
अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने मदत पुरवली. यामुळे जखमी महिलांना लवकर उपचार मिळाले. स्थानिक पोलिसांनी प्रशासकीय यंत्रणेसोबत संपर्क केला अन् तातडीने जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलांना चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.