पुणे अपघात प्रकरणात आता मुलाच्या आईची एन्ट्री, पाहा कोणाला धमकावल्याचा आरोप

| Updated on: May 29, 2024 | 8:37 PM

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात दररोज मोठे खुलासे होत आहेत. आज या प्रकरणात मुलाच्या आईची देखील चौकशी केली जात आहे. मुलाच्या आईने डॉक्टरांना धमकवल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांकडून विशाल अग्रवालच्या पत्नीला देखील अटक होण्याची शक्यता आहे.

पुणे अपघात प्रकरणात आता मुलाच्या आईची एन्ट्री, पाहा कोणाला धमकावल्याचा आरोप
Follow us on

पुण्यातील अल्पवयीन मुलांने भरधाव गाडीने दोन जणांना उडवल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हे प्रकरण आता इतके मोठे झाले आहे की, या अल्पवयीन मुलामुळे सर्व कुटुंब अडचणीत आले आहे. या प्रकरणात आता मुलाच्या आईची एन्ट्री झाली आहे. अल्पवयीन आरोपीच्या आईची आता पुणे पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. डॉक्टरांना धमकावल्या प्रकरणी पोलिसांकडून ही चौकशी केली जात आहे. पुणे पोलिसांकडून अग्रवाल कुटुंबाची चौकशी सुरु आहे.

शिवानी अग्रवाल यांची चौकशी

पुणे हिट अँड रन प्रकरणात या आधीच मुलाचे आजोबा आणि वडील पोलीस कोठडीत आहेत. आता या प्रकरणात मुलाच्या आईची देखील चौकशी सुरु असून त्यांना देखील अटक होऊ शकते. या प्रकरणात आतापर्यंत अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याने ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. खोटा रिपोर्ट देण्यासाठी विशाल अग्रवालकडून या दोन डॉक्टरांनी तीन लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून पैसे देखील जप्त केले आहेत.

अनेक जण निलंबित

पुण्यातील हिट अँड रन प्रकरण पुणे पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते. त्यानंतर गुन्हे शाखेने चौकशीचे चक्र फिरवले आणि अनेक जण या प्रकरणात पोलिसांच्या जाळ्यात अडकले. या घटनेनंतर दोन पोलिसांना देखील निलंबित करण्यात आले आहे. यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टरांना ही निलंबित करण्यात आले आहे.

डॉ. अजय तावरे यांच्याकडून न्याय वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख चार्ज काढून घेतला आहे. विजय जाधव यांच्याकडे चार्ज दिला आहे. अतुल घटकांबळे हा शिपाई आहे. त्याला निलंबित केले आहे. श्रीहरी हळनोर हे तात्पुरत्या स्वरुपात वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने २८ तारखेला सेवा समाप्त करण्यात आली आहे.

मुलाच्या आजोबांनी त्यांच्याच ड्राईव्हरला हा गुन्हा आपल्या अंगावर घेण्यासाठी जबरदस्ती केली होती. यासाठी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांनी ड्राईव्हरला रात्रभर घरात डांबून ठेवल्याचं देखील समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सुंरेंद्र अग्रवाल यांना अटक केली होती.