पुणे अपघात प्रकरणावरुन सुषमा अंधारेंकडून 4 जूननंतर गौप्यस्फोट करण्याचा इशारा
पुण्याच्या अपघात प्रकरणावरुन सुषमा अंधारेंनी मोठी शंका उपस्थित केलीये. अटकेत असलेले डॉक्टर अजय तावरेंच्या जीविताला धोका असून सुरक्षा देण्याची मागणी अंधारेंनी केली आहे. तसंच 4 जूननंतर गौप्यस्फोट करण्याचा इशाराही अंधारेंनी दिलाय.
पुणे अपघात प्रकरणावरुन, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी मोठी शंका व्यक्त केलीय. आरोपीचे ब्लड सॅम्पल ज्या डॉ. हळनोरनं डॉ. अजय तावरेंच्या सांगणाऱ्यावरुन बदलले. त्याच डॉ. अजय तावरेंच्या जीवाला धोका असल्याचं अंधारे म्हणाल्या आहेत. त्यांच्या त्यांच्यासाठी सुरक्षेची मागणी केलीये. आता ही शंका सुषमा अंधारेंनी का व्यक्त केली. तर त्यासाठी त्यांनी गेल्या वर्षभरातल्या काही केसेसचा दाखला दिलाय. आतापर्यंत ज्याही प्रकरणांमध्ये अटक झाली, त्यांनी काही नावं घेणार असल्याचं सांगितलं. आता पुण्याच्या अपघात प्रकरणात डॉ. अजय तावरेनंही तेचं म्हटलंय.
अमृता फडणवीसांना ब्लॅकमेलिंग करणारं अनिल जयसिघांनी प्रकरण. अटक झाल्यानंतर जयसिंघानीनं दूध का दूध करणार असं वक्तव्य केलं होतं. पण पुढं या प्रकरणाचं काय झालं ? असा सवाल अंधारेंनी केला.
दुसरं प्रकरण आहे समीर वानखेडे आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं प्रकरण. या प्रकरणात प्रभाकर साईल का साक्षीदार होता, पण साक्ष नोंदवण्याच्याआधीच त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात पुढं काय झालं असा सवाल अंधारेंचा आहे.
तिसरं प्रकरण आहे, पुण्याच्या ससून रुग्णालयातून ड्रग्स रॅकेट चालवणाऱ्या ललीत पाटीलचं. ललीत पाटीलच्या अटकेनंतर ललीतनंही अनेकांची नावं घेणार असल्याचं म्हटलं. त्यावरुन पुढं काय झालं, हाही सवाल अंधारेंनी केलाय.
ललित पाटीलच्या अटकेनंतर तर गृहमंत्री फडणवीसांनी ड्रग्सचं मोठं नेक्सस पुढं येणार असून लवकरच माहिती देणार असल्याचं गेल्या वर्षी ऑक्टबरमध्येच सांगितलं. पण आतापर्यंत कोणतीही माहिती पुढं आली नाही, असा सवाल अंधारेंनी केला.
सुषमा अंधारेंनी, पुणे अपघाताच्या आरोपींचं मंत्रालयातील 6 व्या मजल्याचं कनेक्शन असल्याचाही आरोप केलाय. अर्थात अंधारेंनी बोट 6 व्या मजल्याचा उल्लेख करुन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे दाखवलंय.
पुण्याच्या अपघात प्रकरणात ब्लड सॅम्पलमध्ये हेराफेरी करणारे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळेला बडतर्फ करण्यात आलंय. डॉ.पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली होती, चौकशी नंतर ही कारवाई झाली. त्यातच आता पुन्हा 4 जूनच्या निकालानंतर गौप्यस्फोट करण्याचा इशारा अंधारेंनी दिलाय. आता आणखी अशी कोणती माहिती अंधारेंकडे आहे आणि त्या 4 तारखेची का वाट पाहत आहेत, हाही सवाल आहे.