Teacher day : शिक्षक दिनी धक्कादायक बातमी, पुणे विभागातील या शिक्षकांचा पगार रखडणार
Pune Teacher day : देशभरात आज शिक्षक दिन साजरा होत आहे. शिक्षक दिनीच धक्कादायक बातमी आली आहे. पुणे विभागातील शिक्षकांचा पगार रखडणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा पगार नेमक्या कोणत्या कारणांमुळे होणार नाही...
पुणे | 5 सप्टेंबर 2023 : देशभरात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशीच शिक्षकांसंदर्भात धक्कादायक बातमी आली आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर या तीन जिल्ह्यातील प्रकरणासंदर्भात हा निर्णय आहे. यामुळे या शिक्षकांसमोर वेतनाचा गहण प्रश्न निर्माण होणार आहे. पुणे विभागातील संस्थांचालकांच्या चुकांमुळे या शिक्षकांचा पगार रखडणार आहे. शालार्थ आयडीच्या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी असल्याचा फटका या शिक्षकांना बसणार आहे. शालार्थ आयडी निघाल्याशिवाय शिक्षकांचे पगार होत नाही. यामुळे या शिक्षकांना विनावेतन काम करावे लागणार आहे.
नेमका काय आहे प्रकार
पुणे विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे शालार्थ आयडी तयार करण्यासाठी शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरात 167 शिक्षकांचे प्रस्ताव आले. त्या पैकी 161 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले. कारण या प्रस्तावांमध्ये अनेक त्रुटी होत्या. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत असणारी ही प्रकरणे आहेत.
काय आहेत कारणे
कर्मचाऱ्यांची भरती करताना संस्थांचालकांनी रितसर परवानगी घेतली नाही. सन 2012 नंतर शिक्षक भरतीला राज्यात बंदी होती. त्या काळात भरती झाली आहे. काही शिक्षकांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव अर्धवटच सादर केले गेले आहे. यामुळे हे प्रस्ताव फेटाळण्यात आले. पुणे येथील अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर यांची पुणे बोर्डात प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली होती. त्यावेळी त्यांनी सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर 161 प्रस्ताव फेटाळले.
काय असतो शालार्थ आयडी
शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यासाठी शालार्थ आयडी क्रमांक दिला जातो. हा क्रमांक मिळाल्यानंतरच वेतन सुरू होते. मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यासंदर्भातील प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारींकडे पाठवतात. त्यानंतर हा प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे जातो. त्यांच्याकडून शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठवला जातो. त्यानंतर शिक्षण उपसंचालक आणि शेवटी शिक्षण संचालकांकडून मान्यता दिली जाते. परंतु त्रुटी असल्यास हे प्रस्ताव फेटाळण्यात येतात. पुणे विभागास राज्यातील इतर विभागांमध्ये अशी प्रकरणे घडली आहेत. यामुळे त्या शिक्षकांसमोर वेतनचा प्रश्न निर्माण झाला आहे.