प्रदीप कापसे, पुणे | 4 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात दिला गेला. त्यानिमित्ताने ते पुणे दौऱ्यावर होते. यामुळे शहरात सुरक्षा व्यवस्था कडक होती. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येत आहे. यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली गेली आहे. यावेळी पुणे विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली आहे. विमानतळावर महिलेने माझ्याकडे बॉम्ब असल्याचे सांगितले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. त्या महिलेस त्वरित ताब्यात घेण्यात आले. तिची कसून चौकशी सुरु आहे.
पुणे विमानतळावर गुरुवारी धक्कादायक प्रकार घडला. दिल्लीला निघालेली प्रवासी महिला चेकींग करताना म्हणाली, ‘माझ्याकडे बॉम्ब आहे’. त्यामुळे विमानतळावर खळबळ उडाली. त्या महिलेला पोलिसांनी त्वरित ताब्यात घेतले. निती कपलानी असे त्या महिलेचे नावे आहे. त्या महिलेची कसून चौकशी करण्यात आली. तसेच विमानतळ पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सीआरपीएफ कॉन्स्टेबल दिपाली झवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ७२ वर्षीय निती कपलानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी बॉम्ब असल्याचे का म्हटले, यासंदर्भातील सत्यता तपासण्यासाठी आणि त्यांच्या कृतीमागील हेतू समजून घेण्यासाठी तपास सुरू असल्याचे पीआय एस.आर.कपारे यांनी सांगितले. महिलेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 505 आणि 182 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 आणि 6 ऑगस्ट रोजी पुण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अमित शाह हे साखर महासंघाच्या कार्यक्रमासाठी येत आहे. त्यावेळी ही धमकी आल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पुणे शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री पुण्यात असल्यामुळे कोणताची अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. पुणे विमानतळावरील घटनेनंतर अधिकच लक्ष सुरक्षा यंत्रणेकडून दिले जात आहे.