Ajit Pawar | शरद पवार, अजित पवार यांच्यासंदर्भातील फ्लेक्सची पुणे शहरात जोरदार चर्चा
Pune News | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली. आता दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात सभा घेत आहेत. एकाच परिवारात दोन विरोधी पक्ष राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पाहावे लागत आहे. यासंदर्भात एक फ्लेक्स लागलंय...
पुणे | 15 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील फ्लेक्स नेहमी चर्चेत असतात. पुणे पाट्याप्रमाणे पुणेरी फ्लेक्सची छाप राज्यभर उमटते. कधी भावी मुख्यमंत्री तर कधी भावी खासदार म्हणून बॅनर पुण्यात लागले होते. हू इज धंगेकर या विधानसभा निवडणुकीतील बॅनरची चर्चा सर्वत्र झाली होती. विधानसभा निवडणुकीत नाराज झालेल्या ब्राम्ह्यण समाजाने लावलेले बॅनर चांगलेच गाजले होते. आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन नेत्यांसंदर्भात बॅनर लागले आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यासंदर्भात हे बॅनर लागले आहे.
काय आहे बॅनर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि अजित पवार मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (व्हीएसआय) बैठकीनिमित्त शुक्रवारी एकत्र येणार होते. या ठिकाणीच दोन्ही नेत्यांना आवाहन करणारे बॅनर लावले गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनोमिलनासंदर्भातील हे बॅनर आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बाहेर हा फ्लेक्स लावला आहे. त्यावर लिहिले आहे की, “लहान तोंडी आज घेतो मोठा घास महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस”
कोणी लावला फ्लेक्स
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अजय घुले यांनी हे बॅनर लावले आहे. “लहान तोंडी आज घेतो मोठा घास महाराष्ट्राला लागली आपल्या मनोमिलनाची आस” असे म्हणत दोन्ही नेत्यांचे मांजरी गावात सहर्ष स्वागत असल्याचा मजकूर बॅनरवर आहे. परंतु अजित पवार यांनी या बैठकीला येण्याचे टाळले. ते बैठकीला न येता दौंडच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्याचवेळी या फ्लेक्सची चर्चा संपूर्ण शहरात सुरु आहे.
अजित पवार यांच्या मंत्र्याने केले स्वागत
अजित पवार बैठकीला आले नाही तरी शरद पवार यांच्या स्वागताला अजित पवार गटाचे मंत्री दिलीप वळसे पाटील गेले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला शरद पवार आल्यावर दिलीप वळसे पाटील त्यांच्या स्वागतासाठी गेटवर गेले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील पुन्हा एकदा एकत्र आले.