Pune News : अंगावर शहारे आणणार व्हिडिओ, भांडणाचा राग धरुन अल्पवयीन कार चालकाकडून महिलेस चिरडण्याचा प्रयत्न
Pune Crime News: आळंदी जवळील असणाऱ्या वडगाव घेणंद येथील व्हिडिओ समोर आला आहे. जुन्या भांडणाचा रागामुळे एका अल्पवयीन कार चालकाने महिलेसह नागरिकांना भरधाव कारने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे.
पुणे शहरातील बड्या बिल्डरच्या मुलाने मद्यधुंद नशेत भरधाव कार चालवत दोघांना उडवले होते. या प्रकरणाचे वादळ अजूनही शांत झाले नाही. या प्रकरणात त्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल, अजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल, अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना अटक झालेली आहे. या प्रकरणात पोलीस कर्मचारी, ससून रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर आणि मध्यस्थांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतरही पुण्याजवळील आळंदीत एका अल्पवयीन मुलाने धक्कादायक प्रकार केला आहे. जुन्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार त्या मुलाने केला आहे.
काय घडला प्रकार
आळंदी जवळील असणाऱ्या वडगाव घेणंद येथील व्हिडिओ समोर आला आहे. जुन्या भांडणाचा रागामुळे एका अल्पवयीन कार चालकाने महिलेसह नागरिकांना भरधाव कारने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचे त्या व्हिडिओत दिसत आहे. हा अल्पवयीन कार चालक त्या महिलेस चिरडण्यासाठी आधी कार पाठीमागे (रिव्हर्स) घेऊन जातो. त्यानंतर भरधाव वेगाने चालवत काही नागरिकांना आणि त्या महिलेस चिरडण्याचा प्रयत्न करतो. या घटनेचा थरार कॅमेरात कैद झाला आहे. अंगावर काटा आणणार आणि मनात धडकी भरवणारा हा व्हिडिओ आहे.
त्यानंतर तरुणाकडून शिविगाळ
अल्पवयीन मुलाने हा अपघाताचा थरार केल्यानंतर तो थांबला नाही. त्यानंतर तो कारच्या छतावर बसून शिवीगाळ करताना दिसत आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी आळंदी पोलिसांत नाजुका थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
अंगावर शहारे आणणार व्हिडिओ…पुण्यात महिलेस चिरडण्याचा प्रयत्न pic.twitter.com/J1uUhUlHQb
— jitendra (@jitendrazavar) June 17, 2024
पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा
दरम्यान, अल्पवयीन मुलाच्या हातात कार देणाऱ्या पालकावर अजून काहीच कारवाई झाली नाही. पुणे आणि परिसरात बड्या व्यक्तींच्या अल्पवयीन मुलाना गाड्या देणे नागरिकांच्या जीवावर उठले आहे. पोर्श प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुले अन् त्यांच्या पालकांविरोधात कारवाई करण्याची गरज आहे.