बात निकली है तो दूर तक जाएगी…; अमोल कोल्हे यांचं अजित पवार यांना प्रतिआव्हान
Amol Kolhe on Ajit Pawar Challange about Shirur Loksabha Constituency : दादा... खासगीतील चर्चा सार्वजनिक करायची नसते; असं अमोल कोल्हे का म्हणाले? अमोल कोल्हे यांनी अजितदादांना काय आव्हान दिलं? शरद पवारांच्या भेटीनंतर अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया, वाचा सविस्तर...
प्रदीप कापसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, पुणे | 26 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं गेलंय. तेही कुणी दुसऱ्या पक्षातील नेत्याने नव्हे तर काही महिन्यांआधीपर्यंत राष्ट्रवादीचे नेते असलेले अन् अमोल कोल्हे यांचे जुने सहकारी अजित पवार यांच्याचकडून… थेट उपमुख्यमंत्र्यांनीच असं आव्हान दिल्यानंतर अमोल कोल्हे आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच आज अमोल कोल्हे यांनी पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर कोल्हे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हा त्यांनी अजिच पवार यांना प्रतिआव्हान दिलं आहे. बात निकली है तो दूर तक जाएगी, असा इशाराच अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना दिलाय.
कोल्हेंचं अजितदादांना आव्हान
काही खासदारांनी आपल्या मतदारसंघातील कामाकडे लक्ष दिलं असतं. तर बरं झालं असतं. त्यातल्या एका खासदार माझ्याकडे आला होता. मला राजीनामा द्यायचाय, असं त्याने सांगितलं. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्याला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलंय. दीड वर्षांपूर्वी अमोल कोल्हे यांनी राजीनामा दिला होता, असा दावा अजित पवार यांनी काल केला.
अमोल कोल्हे यांना आज प्रश्न विचारला असता अमोल कोल्हे यांनी एका हिंदी वाक्यातून अजित पवारांना उत्तर दिलं. बात निकली है तो दूर तक जाएगी, असं अमोल कोल्हे म्हणालेत. अजूनही मी त्यांच्या नेतृत्वाचा आणि त्यांच्या ज्येष्ठतेचा मी कायमच आदर करत आलो आहे. त्या विषयी बोलणं मला उचित वाटत नाही. खासगीमध्ये झालेली चर्चा सार्वजनिक करायची नसते, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना इशारा दिला आहे.
‘त्या’ भेटीवर टीका
मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवायचा असला की वरती वेळ मिळते. मात्र शेतकऱ्यांच्या विषय असला की वेळ मिळत नाही, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीवर टीका केली आहे.