नितेश राणेजी आपले मनापासून धन्यवाद!; कुणी मानले आभार?
Anand Dave on Nitesh Rane : नितेश राणे यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये जात केली महाआरती; कुणी मानले आभार?
पुणे : हिंदू महासंघाच्या जाहीर कौतुकसाठी धन्यवाद नितेशजी…,, असं म्हणत हिंदू महासंघचे आनंद दवे यांनी भाजप आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी असंच राहणं आवश्यक आहे. खरं तर राज ठाकरे किंवा संजय राऊत यांना त्र्यंबकेश्वरच्या निमित्ताने हिंदू धर्मावर येणाऱ्या संकटाची तीव्रताच कळली नाही, असं आनंद दवे म्हणालेत.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील महाद्वारासमोर धूप दाखविण्याचं प्रकरण समोर आलं. त्यानंतर नितेश राणे यांनी मंदिरात जात महाआरती केली. या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नितेश राणे यांच्या भूमिकेचं आनंद दवे यांनी स्वागत केलं आहे.
तुमची जर त्र्यंबकेश्वरवर श्रद्धा असेल. त्याला मानत असाल तर तुम्ही तिलक लावून हिंदू पद्धतीने पूजा करायला हवी. गोल टोपी घालून, काजळ घालून, वेगळ्या पद्धतीचा हार आणि हिरव्या शालीचा आग्रह कसा चालेल?, असा सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे.
काही मूर्ख हिंदू चर्चला जातात, तेव्हा चर्चच्या पद्धतीने वागतात. आम्ही चर्चला जाऊन आरतीचा, गुरुद्वारात जाऊन डोक्यावरून रुमाल न घेण्याचा, तिथं गणपतीच्या आरतीचा आणि दर्ग्यात जाऊन हिंदू पूजेचा आग्रह धरू शकतो का? आस्था असेल तरी तुमच्या देवांच्या पूजा आमच्या पद्धतीने करू ते सुद्धा वर्षात एकदाच. हा जिहादच आहे. तो आम्ही थांबवला. त्याचा आम्हाला अभिमान आहे. पुन्हा एकदा धन्यवाद नितेशजी, असं म्हणत टीव्ही 9 मराठीशी बोलताना आनंद दवे यांनी नितेश राणे यांचे आभार मानलेत.
आनंद दवे यांनी मेट्रो प्रकल्प आणि रोजगारावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. क्या हुआ तेरा वादा… सरकारी प्रोजेक्टच्या नोकरीसाठी स्थानिकांना प्राधान्य देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. पुणे मेट्रोसाठीच्या इंजिनीरिंग डिपार्टमेंटसाठी भरती मात्र बिहारमधून होत आहे. हे योग्य नाही, असं म्हणत दवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
जवळ-जवळ सर्वच लहान व्यावसाय आणि सर्विस इंडस्ट्रीमध्ये आता उत्तर भारतीयच दिसत आहेत. आता या मेट्रो प्रोजेक्टवर पण उत्तर भारतीयच दिसतील. उद्या आम्ही मेट्रो अधिकाऱ्यांची या संदर्भात भेट घेत आहोत. त्यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करणार आहोत, असं आनंद दवे म्हणाले आहेत.