अॅनिमेशन आर्टिस्टने झटपट श्रीमंत होण्याच्या नादात काय केले ? आता खावी लागली जेलची हवा
तक्रारदाराने केलेल्या व्यवहाराच्या पुराव्याच्या आधारे आणि लाभार्थीच्या खात्यातून मिळालेल्या तपशिलांच्या आधारे पोलीस पथक महाराष्ट्रातील पुणे येथे पोहोचले
पुणे : झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग खडतर असतो. त्याला परिश्रम घ्यावे लागतात. रात्रंदिवस मेहनत करावी लागते. परंतु एखाद्याने लवकर श्रीमंत होण्यासाठी चुकीचा मार्ग निवडला तर त्याला कारागृहाची हवा खावी लागते. पुण्यातील (Pune Crime News) एका अॅनिमेशन आर्टिस्टवर असा प्रसंग आला. लवकर पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी त्याने जे केले त्यामुळे दिल्लीतील पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव पियुष शर्मा आहे. पोलिसांनी त्याला महाराष्ट्रातील अनेक शहरात 5 दिवस पाठलाग करून पकडले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर बाजार पोलिस ठाण्यात पियुष शर्मा यांच्यासंदर्भात तक्रार आली. येथील घाऊक व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाने इंडिया मार्टच्या प्लॅटफॉर्मवर 1200 किलो शंख, मणी आणि रुद्राक्षाची मागणी नोंदवली. त्यानंतर पियुष शर्मा याने त्याच्याशी संपर्क साधला. हे साहित्य स्वस्त दरात मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी त्याने या साहित्यासाठी १.७३ लाख रुपये दिले. मात्र यानंतर आरोपीने त्याला कोणतीही डिलिव्हरी दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार केली.
प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रारदाराने केलेल्या व्यवहाराच्या पुराव्याच्या आधारे आणि लाभार्थीच्या खात्यातून मिळालेल्या तपशिलांच्या आधारे पोलीस पथक महाराष्ट्रातील पुणे येथे पोहोचले. पोलिसांनी 5 दिवस आरोपीचा पाठलाग केला. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यात त्याने आणखी तीन जणांची फसवणूक केल्याचे मान्य केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
मुंब्रात एकास अटक
मुंब्रात दार तोडून चोरट्याने चार मोबाईल लंपास केले होते. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे मुंब्रा कौसा येथे राहणाऱ्या अब्दुल समद नूर मोहम्मद सकानी या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता त्याने चोरीला गेलेले चार मोबाईल तर परत केलेस पण त्यासोबतच जवळपास 98 महागडे मोबाईल एक लॅपटॉप आणि दोन मोटारसायकल जप्त करण्यात नौपाडा पोलिसांना यश आले.
नौपाडा पोलिसांनी केलेल्या तपासात अब्दुल समद या अट्टल गुन्हेगारावर ठाण्यातील विविध पोलीस स्थानाकांमध्ये आतापर्यंत एकूण बारा गुन्हे दाखल झाले असे निष्पन्न झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी आपल्या मोबाईल आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि चोरी होताच त्वरित स्थानिक पोलिसात तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी केले