Raj Thackeray | पुण्यात राज ठाकरेंविरोधात बॅनरबाजी, सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्वाचा आरोप!
त्यांच्याच व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंना हे स्मरण करून देण्यात आले आहे. तसेच सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्वाचा आरोपदेखील या बॅनर्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
पुणे : दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) अयोध्येला जाण्याची घोषणा केली. त्यावरून त्यानंतर आज पुण्यात राज ठाकरेंविरोधात उपहासात्मक बॅनर्स लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या बॅनर्सवर राज ठाकरे यांनीच काढलेल्या व्यंगचित्राचा (Cartoon) वापर करण्यात आला आहे. पुण्यातील अलका टॉकीज, गुडलक चौक तसेच कोथरूड येथील करिष्मा चौक येथे हे बॅनर्स झळकवण्यात आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंना शेवटी अयोध्येत जावेच लागणार आहे, अशी वेळ कुणावरही येऊ नये, अशा आशयाचा मजकूर या बॅनर्सवर लिहिण्यात आला आहे. हे बॅनर्स कुणी लावलेत, हे अद्याप समजू शकलेले नाही, पण पुण्यात आज त्यांची चांगलीच चर्चा सुरु आहे.
‘सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व’
यापूर्वी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली होती. मात्र आता त्यांनीच स्वतः अयोध्येत जाण्याची घोषणा पुण्यात केली. त्यामुळे त्यांच्याच व्यंगचित्राच्या माध्यमातून राज ठाकरेंना हे स्मरण करून देण्यात आले आहे. तसेच सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्वाचा आरोपदेखील या बॅनर्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
राज ठाकरेंना सुरक्षा प्रदान करणार?
हिंदुत्वाबद्दल आक्रमक भूमिका घेत राज ठाकरे यांनी येत्या 03 मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा मनसेची तीव्र प्रतिक्रिया उमेटल, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनीही राज ठाकरेंच्या जीवाला धोका असल्यास सुरक्षा देण्यात गैर नाही, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांकडून जास्त सुरक्षा देण्याबाबत लवकरच समितीमार्फत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले आहे.
अशांतता निर्माण झाल्यास कारवाई करणार- गृहमंत्री
राज ठाकरे यांनी भोंग्यांबाबत दिलेल्या इशाऱ्यानंतर समाजाची शांतता भंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कुठल्याही वक्तव्यामुळे, कृतीमुळे समाजात तेढ आणि अशांतता निर्माण होत असल्यास अशी कृती कारवाईला पात्र ठरते. त्यानुसार कारवाई करू, सगळ्या देशात एकप्रकारे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु महाराष्ट्र पोलीसही समाजाची शांतता भंग होणार नाही, यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
इतर बातम्या-