Ajit Pawar | 70 लाख कोटी वाचवण्यासाठी तुम्ही भाजपसोबत गेला…अजित पवार यांना कोणी केला सवाल
Pune Ajit Pawar | अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत गेले. आम्ही कुठे जायचं? असा खडा सवाल अजित पवार यांच्या बारामतीत विचारला गेला. बारामतीत झालेल्या आंदोलना दरम्यान हा प्रश्न विचारत महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
पुणे | 6 ऑक्टोंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपल्या रोखठोक स्वभाव आणि कामांमुळे ओळखले जातात. त्यांच्या कामाच्या पद्धतीची चर्चा नेहमी होत असते. आता अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला आहे. अजित पवार यांचा मतदार संघ असलेल्या तालुक्यातून त्यांना हा प्रश्न विचारला आहे. तसेच अजित पवार यांना मतदान करु नका, असे आवाहन करण्यात आले आहे. बारामती तालुक्यातील तरडोली येथील तरुणाने हा प्रश्न विचारला आहे. पुणे-बारामती रस्त्यावर शुक्रवारी रास्ता रोको आंदोलनही केले गेले.
कशासाठी सुरु आहे आंदोलन अन् उपोषण
सागर जाधव यांनी दुधाला दर मिळावा या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. शुक्रवारी त्यांचा उपोषणाचा सहावा दिवस होता. त्यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी ग्रामस्थांच्या वतीने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पुणे बारामती रस्तावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी तरुणांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले.
काय केले आरोप
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर रास्ता रोको आंदोलन करणारे विजय भोसले यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, अजित दादा ७० लाख कोटी वाचवण्यासाठी तुम्ही भाजप सोबत गेलात. पण आम्ही कोणाकडे जायचं ? आधी आम्हाला देवेंद्र फडणवीस खोटे वाटायचे पण आता ते खरे वाटतात आणि तुम्ही खोटे वाटतात. पुढच्या काळात जिरायती भागाने अजित पवार यांना मतदार करू नये, असे आवाहन केले जाईल, असे भोसले यांनी म्हटले.
तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही…
दुधाला चाळीस रुपये दर मिळावा, ही आमची मागणी आहे. परंतु राज्य सरकार आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले जात आहे. तसेच जोपर्यंत चाळीस रुपये दर दुधाला मिळणार नाही, तोपर्यंत बारामतीमधील आंदोलन मागे घेणार नाही, असे सागर जाधव यांनी यावेळी सांगितले.