Chandrayaan : चंद्रयान-3 मध्ये पुणे शहरातील या कंपनीचा खारीचा वाटा, इस्त्रोसोबत अनेक वर्षांपासून काम
Chandrayaan 3 : चंद्रयान ३ ही भारतीची मोहीम यशस्वी झाली. जगभरात भारताच्या या मोहिमेचे कौतूक केले जात आहे. भारताच्या अंतराळ संस्थेने केलेल्या या कामगिरीत पुणे शहरातील एका कंपनीचा खारीचा वाटा आहे.
पुणे | 24 ऑगस्ट 2023 : भारतीय अंतराळ संस्थेच्या (इस्त्रो) इतिहासात 23 ऑगस्टचा दिवस सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत जगातील पहिलाच देश ठरला आहे. आतापर्यंत फक्त तीन देशांची चंद्रावर मोहीम केली आहे. परंतु दक्षिण ध्रुवावर कोणताही देश पोहचू शकला नव्हता. यामुळे जगभरात इस्त्रोच्या कामगिरीचे कौतूक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत पुढील मोहिमांची घोषणा केली आहे. इस्त्रोसोबत पुणे शहरातील एक कंपनी अनेक वर्षांपासून काम करत आहे. यामुळे चंद्रयान मोहिमेत या कंपनीचा खारीचा वाटा आहे.
कोणती कंपनी आहे सोबत
पुणे शहरातील वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड (WIL) ने चंद्रयान 3 मिशनमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. या मोहिमेसाठी वालचंदनगर कंपनीने इस्त्रोसोबत काम केले. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड मागील 50 वर्षांपासून इस्त्रोसोबत काम करत आहे. 1973 पासून इस्त्रो सर्व उपक्रमासाठी WIL हार्डवेयर प्रॉडक्शन पार्टनर म्हणून काम करत आहे.
चंद्रयानसाठी कशाची केली निर्मिती
WIL कंपनीने चंद्रयान 3 मिशनसाठी LVM3 लॉन्च वाहनात महत्वाचे असणारे बूस्टर सेगमेंट S200 ची निर्मिती केली. तसेच त्याची प्रूफ प्रेशर-टेस्टिंग करण्यात आली. LVM3-M4s सबसिस्टमसाठी फ्लेक्स, नोझल कंट्रोल टँकेज आणि S200 फ्लेक्स नोझल वालचंदनगर इंडस्ट्रीजने बनवले.
कंपनीची स्थापना कधी झाली
वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची स्थापना 1908 मध्ये झाली. इंजीनिअरिंग उत्पादनात ही कंपनी काम करते. पुणे शहरापासून 135 किमी लांबीवर बारामती आणि इंदापूर दरम्यान ही कंपनी आहे. कंपनीची स्थापना सेठ वालचंद हिराचंद दोशी यांनी केली होती. कंपनी संरक्षण, एअरोस्पेससारख्या क्षेत्रातही काम करत आहे. इस्त्रोसोबत 1973 पासून ही कंपनी कार्यरत आहे.
पहिला शिपिंग यार्ड बनवला
वालचंद कंपनीने देशात पहिला शिपिंग यार्ड बनवला होता. यामुळे 5 एप्रिल 1919 रोजी पहिला स्वदेशी जहाज समुद्रात उतरवला. शिपिंग यार्डसोबत पहिला विमान कारखानाही कंपनीने दिला. कंपनी शिपिंग, एव्हिएशन, ऑटोमोबाइल क्षेत्रात काम करत आहे.