विरोधी पक्षनेतेपद पुणे जिल्ह्यास मिळणार? काँग्रेसच्या या नेत्याचे नाव आले पुढे
maharashtra politics news : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटाकडे काँग्रेसपेक्षा कमी आमदार राहिले आहे. यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी तयारी सुरु केलीय.
विनय जगताप, पुणे | 16 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंधरा दिवसांपूर्वी बंड केले. शरद पवार यांच्यापेक्षा वेगळी वाट त्यांनी निवडली. अजित पवार भाजप-शिवसेना युतीसोबत आले अन् राज्यातील सत्तेत सहभागी झाले. अजित पवार यांच्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे शरद पवार गटासोबत असणाऱ्या आमदारांची संख्या कमी झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद होते. ते आता काँग्रेसकडे जाणार आहे.
काँग्रेसमधून कोणाचे नाव
पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी कंबर कसली आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिल्याची चर्चा होती. मात्र या चर्चेचा इन्कार संग्राम थोपटे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना केला. आपण कुठल्याही प्रकारचे पत्र पक्षश्रेष्ठींना लिहिलेले नाही, असा दावा त्यांनी केला.
संधी दिली तर…
आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार आहे. परंतु मी या क्षणापर्यंत पद मागण्यासाठी कुठलेही पत्र लिहिलेले नाही, पण पक्षाने माझ्या कामाचा विचार करुन हे पद मला दिले, तर मी विरोधी पक्ष नेता होईल. काँग्रेसचे आमदार फुटणार नाही, यात तीळमात्र शंका नाही, असा दावा त्यांनी केला. कुणाच्या मनात काय आहे, हे आपण ओळखू शकत नाही, मात्र आज तरी काँग्रेसचा कुठलाही आमदार, लोकप्रतिनिधी दुसऱ्या विचारधारेला स्वीकारणार नाही, असा दावा थोपटे यांनी केला.
अधिवेशनात कशाला प्राधान्य
अधिवेशात आम्ही नेहमी प्रश्न मांडत असतो. आताही विकाससंदर्भातील प्रश्न मांडण्यात येईल. जनतेच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांवर जाब विचारला जाणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी म्हटले आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरु होत आहे. दोन आठवडे हे अधिवेशन चालणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना कसे घेरणार? याकडे लक्ष लागले आहे.