योगेश बोरसे, पुणे | 14 ऑगस्ट 2023 : शिस्तबद्ध पक्ष म्हटला जाणारा भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये सुरु आहे. पुणे शहरातील चांदणी चौक पुलाच्या निमित्ताने हा वाद माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी माध्यमांसमोर मांडला. त्यानंतर उद्घाटन समारंभात मेधा कुलकर्णी यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. तसेच केंद्रीय नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आता या वादाला पुन्हा यु टर्न मिळाला आहे. भाजप कोथरुड मंडळ अध्यक्षांनी मेधा कुलकर्णी यांना घेरले आहे.
पुणे कोथरुडमधील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. आपण जुन्या कार्यकर्ते असताना पुणे शहरातील भाजप नेत्यांकडून डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेवरुन त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा त्यांनी साधला. परंतु पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना यावर काही प्रतिक्रिया दिली नव्हती.
मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत पाटील वादात कोथरूड मंडल अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे पुनीत जोशी यांनी उडी घेतली. मेधा कुलकर्णी यांच्याबाबत भाजप कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मेधा कुलकर्णी सातत्याने पक्ष शिस्त मोडत असल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे, असा आरोप जोशी यांनी केला.
निमंत्रण पत्रिकेत मेधा कुलकर्णी यांचे छायाचित्र नाही, हा त्यांचा आक्षेप होता. मात्र शहरातील २४० जाहिरात फलकांवर मेधा कुलकर्णी यांचे छायाचित्र लावले होते, ही बाब त्यांनी दुर्लक्षित का केली? नाराजी असली तरी ती जाहीर करायची नाही, अशी पक्षाची शिकवण आहे. आधी पक्ष नंतर व्यक्ती ही पक्षाची विचारधारा आहे,
मात्र ती दुर्लक्षित करून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचा बद्दल आश्चर्य वाटत आहे, अशी भूमिका पुनीत जोशी यांनी सोशल मीडियातून मांडली.