पुण्यातील कसब्यानंतर भाजप सावध, पुन्हा धोका नको ? बापट कुटुंबियांना संधी ?
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी गिरीश बापट यांचा वारस कोण? यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. भाजपमधील पदाधिकाऱ्यांनीही आपली भूमिका जाहीर केलीय.
पुणे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे २९ मार्च रोजी निधन झाले. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणूक येत्या सहा महिन्यात होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच आता गिरीश बापट यांचा वारस कोण? अशी चर्चा रंगली आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वाधिक लॉबिंग भाजपमध्येच सुरू आहे. या जागेसाठी भाजपमधून काही जणांची नावे चर्चेत आली आहे. परंतु कसबा मतदार संघात झालेल्या पराभवानंतर भाजप सावध झाला आहे. गिरीश बापट यांच्या परिवारात उमेदवारी देण्यासंदर्भात भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
कसबातून धडा घेणार
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भाजपचा ३२ वर्षांपासूनचा अभेद्द गढ गेला. या पराभवाची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली आहे. टिळक कुटुंबियांना उमेदवारी दिली नसल्यामुळे पराभव झाल्याचा एक निष्कर्ष काढण्यात आला होता. कसबा पेठेत उमेदवार निवडताना आमची चूक झाल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी म्हटले होते.म्हणजेच कसबाच्या पराभवातून भाजप धडा घेणार आहे.
आता बापट कुटुंबियांचा पर्याय
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून माजी खासदार संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे आणि जगदीश मुळीक यांची नावे चर्चेत आहेत. मात्र बापट यांची सून स्वरदा बापट किंवा त्यांची पत्नी गिरिजा बापट यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. बापट यांचा मुलगा गौरव यांना राजकारणात रस नाही. परंतु स्नुषा स्वरदा यांना राजकारणाचा अनुभव आहे. त्या लग्नाआधी सांगली मनपाच्या नगरसेविका होत्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम त्यांनी केले आहे. गिरीश बापट यांच्या खासदारकीच्या निवडणुकीपासून त्या पुणे शहरातील राजकारणात सक्रीय आहे.
भाजपकडून पुणे लोकसभा निवडणुकीत बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. कसब्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजप बापट यांच्या सूनेला तिकीट देण्याची शक्यता आहे. स्वरदा बापट यांना तिकीट मिळाल्यास काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार नसल्याची शक्यता आहे. मात्र, इतरांना उमेदवारी दिल्यास भाजपमधूनच नाराजीचा सूर उमटू शकतो. कसब्यात जे झालं तेच लोकसभेला होऊ शकतं. त्यामुळे बापट यांच्या कुटुंबीयांना डावलणं भाजपला परवडणारं नसेल, असं सूत्रांनी सांगितलं.
काय होणार फायदा
निवडणूक सहा महिन्यांनी होणार आहे. तोपर्यंत लोकसभेचा कार्यकाळा एका वर्षापेक्षाही कमी राहणार आहे. तसेच बापट कुटुंबियांना संधी दिल्यास इतर पक्ष बिनविरोध निवडणुकीसाठी सहकार्य करु शकतात. यामुळे बापट कुटुंबियांना संधी देण्याबाबत चर्चा सुरु आहे. कसबासारखा धोका आता नको? असे भाजप पदाधिकारी सांगत आहेत.
हे ही वाचा
पुणे शहरात पुन्हा निवडणुकीचे पडघम? विधानसभेनंतर आता लोकसभा पोटनिवडणूक होणार का?