मुख्यमंत्र्यांनीच गडकरींना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं, पण आता एकनाथ शिंदे चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाला गैरहजर राहणार?
Pune Chandni Chowk Inauguration Today News : आधी निमंत्रण अन् आता कार्यक्रमाला मुख्यमंत्री हजर राहण्याबाबत संभ्रम; चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कार्यक्रमात नेमकं काय घडतंय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या कुठे आहेत? वाचा सविस्तर वृत्तांत...
पुणे | 12 ऑगस्ट 2023 : आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण आज पुणेकरांच्या दृष्टीने महत्वाचा असणारा चांदणी चौकातील उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं आज सकाळी 11 वाजता लोकार्पण होणार आहे. मात्र या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार नसल्याची माहिती आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करणारे मुख्यमंत्री कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पुण्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे.
चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजच्या दौऱ्यात चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नियोजित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी होणाऱ्या महामार्ग बैठकीला उपस्थित राहतील असंही दौऱ्यात आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.
चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार नाहीत, अशी माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरे गावी मुक्कामी आहेत. उड्डाणपूलाच्या उद्घाटन सोहळ्याला मुख्यमंत्री प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी अचानक आपल्या कार्यक्रमात बदल केला गेला आहे. मुख्यमंत्री येणार नसल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या दरे या गावी आहेत. 14 ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्री गावीच थांबणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते पुण्याच्या कार्यक्रमात जाणार की नाही यावर संभ्रम कायम आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री गावीच थांबणार असल्याने सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे ना? अशा चर्चांनाही उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. व्यासपीठावर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची खुर्ची लावण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे अजूनही त्यांच्या दरे गावातच आहेत.
भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली आहे. असे निष्ठावंतांचे डावललेले जाणे…, असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले, असं त्या म्हणाल्या आहेत.
“Disappointed” . .#BJPKothrud #BjpPune pic.twitter.com/UEIV1lV40w
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) August 11, 2023