Pune News : पुणे शहरात सर्वसामान्यांना मिळणार हायफाय उपचार, रुग्णांना कसा मिळणार फायदा
Pune News : पुणे शहरातील रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळणाऱ्या हॉस्पिटलची संख्या वाढली आहे. अत्याधुनिक उपाचार आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना घेता येणार आहे. त्याचा फायदा अनेक रुग्णांना होणार आहे...
पुणे | 11 सप्टेंबर 2023 : पुणे शहराचा विस्तार वाढला अन् शहरातील रुग्णालयांची संख्या वाढली. पुणे शहरात अनेक खासगी रुग्णालयांमधून अत्याधुनिक उपचार पद्धतीचे अवलंबन केले जाते. परंतु या रुग्णालयामधील उपचार सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे सामान्य रुग्णांना सरकारी रुग्णालयाचा पर्याय ठरतो. आता पुणे शहरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांना उपचार मिळणार आहे. हे उपचार मोफत होणार आहे. यापूर्वी पुण्यात अशी ५६ रुग्णालये होती. आता त्यांची संख्या ६६ झाली आहे.
कसे मिळणार उपाचार
पुणे शहरातील धर्मादाय आयुक्तांनी आणखी दहा रुग्णालयांची नोंद केली आहे. यापूर्वी पुण्यात ५६ धर्मादाय हॉस्पिटल होती. आता त्यात नव्या दहा रुग्णालयाची भर पडली आहे. यामुळे ही संख्या ६६ झाली आहे. या ठिकाणी आर्थिक दृष्या दुर्बल रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहे. गरिब रुग्णांवर धर्मादाय हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जातात. त्यामध्ये मोठ्या हॉस्पिटलचा समावेश असतो.
यांची नोंद धर्मादाय कार्यालयाकडे
धर्मादाय विभागाकडे विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांची नोंद केली जाते. ज्या संस्था ट्रस्ट, एनजीओ चालवतात त्याची नोंदणी होत असते. ज्या हॉस्पिटलचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त असते, त्यांची नोंद करावी लागते. काही संस्थांनी अशा हॉस्पिटलची नोंद केली नसल्याचे पाहणीत दिसून आले. धर्मादाय विभागातील रुग्णालयांना नाममात्र दरात जागा दिली जाते. तसेच पाणी, वीज बिलमध्ये सवलत दिली जाते. त्यांना जास्त एफएसआय दिला जातो. यामुळे या रुग्णालयांमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णालयासाठी जागा राखीव असतात.
दहा टक्के खाटा राखीव
धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेल्या रुग्णालातील दहा टक्के खाटा राखीव ठेवण्यात येतात. आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांवर या दहा टक्के खाटांवर उपचार केले जातात. ज्यांचे उत्पन्न १ लाख ८० हजारांच्या आत आहेत, त्या रुग्णांवर पूर्णपणे मोफत उपाचार होतो. तसेच ज्यांचे उत्पन्न ३ लाख ६० हजारावर आहे, त्यांना बिलात ५० टक्के सुट मिळते.
नवीन कोणत्या रुग्णालयांचा झाला समावेश
- दीनदयाळ मेमोरियल हॉस्पिटल, एफसी रोड, पुणे
- रिरीराज हॉस्पिटल, बारामती
- एस. हॉस्पिटल, पुणे
- प्रशांती कॅन्सर केअर मिशन, सेनापती बापट रोड, पुणे
- वैद्य पी.एस.नानल रुग्णालय, कर्वे रोड, पुणे
- परमार हॉस्पिटल, औंध, पुणे
- मेहता रुरल क्रिकिटक केअर सेंटर, पुणे
- साळी हॉस्पिटल, मंचर
- संजीवनी हॉस्पिटल, कर्वे रोड, पुणे
- जोशी हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे