महाविद्यालयीन प्रवेशाच्या तीन फेऱ्या, परंतु अजूनही पुणे शहरातील ६० टक्के जागा रिक्त
Pune News : पुणे शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते. पुणे शहरात शिक्षणासाठी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून विद्यार्थी येतात. परंतु यंदा महाविद्यालयीन प्रवेश तीन फेऱ्यानंतरही पूर्ण झालेले नाही. यामुळे आता विशेष फेरी होणार आहे.
पुणे | 18 जुलै 2023 : राज्यातील शिक्षणाचे महत्वाचे केंद्र म्हणजे पुणे शहर आहे. पुणे शहरात शिक्षणाचा सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. एमपीएससी, युपीएससी परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी या शहरात येतात. शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत सर्वच अभ्याक्रमांचे शिक्षण या ठिकाणी घेता येते. यामुळे पुणे शहर शिक्षणाचे हब झाले आहे. परंतु पुणे शहरांमधील महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आहे. महाविद्यालयीन प्रवेशाच्या ६० टक्के जागा रिक्त आहेत. आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये फक्त ४० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे.
किती जणांनी प्रवेश झालाय
दहावीचा निकालानंतर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचे वेध लागते. अनेक विद्यार्थी पुणे शहरात प्रवेशासाठी गर्दी करतात. परंतु सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांत पुणे शहरातील महाविद्यालयांमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. पुणे विभागात अकरावीत आतापर्यंत 71 हजार जाणांनी प्रवेश घेतला आहे. तर पुणे शहरात अजून फक्त 44 हजार विद्यार्थ्यांनीच अकरावीसाठी प्रवेश घेतला आहे.
प्रवेशाच्या तीन फेऱ्या
पुणे शहरातील महाविद्यालयीन प्रवेशासाठी तीन फेऱ्या झाल्या आहेत. या तीन फेऱ्यानंतर प्रवेश पूर्ण झाले नसल्यामुळे आता विशेष फेरी राबवण्यात येणार आहे. या विशेष फेरीतून विद्यार्थ्यांना प्रवेशाची आणखी एक संधी दिली जाणार आहे.
कोणत्या शाखेला कमी प्रवेश
पुणे शहरातील महाविद्यालयांमध्ये विज्ञान आणि वाणिज्य शाखेसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केलीय. या दोन्ही शाखांचे प्रवेश शंभर टक्के झाले आहे. परंतु कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. कला शाखेच्या ७० टक्के जागा रिक्त आहेत. यामुळे आता १७ जुलैपासून विशेष फेरी राबवण्यात येणार आहे.
का फिरवली विद्यार्थ्यांनी पाठ
विद्यार्थ्यांचा कल सध्या विज्ञान अन् वाणिज्य शाखेकडे आहे. यामुळे या दोन्ही शाखांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत बारावीनंतर अनेक पर्याय उपलब्ध असतात. वाणिज्य शाखेत बारावीनंतर विद्यार्थी विविध व्यवस्थापनशास्त्र शाखेकडे जातात. त्या तुलनेत कला शाखेकडे प्रवेश कमी आहे. यामुळे कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.