पुणे | 14 सप्टेंबर 2023 : आई-वडील आपला मुलगा किंवा मुलगीसाठी सर्व कष्ट सहन करण्याची तयारी ठेवता. आपल्या लाडक्या छकुलीला आनंदात ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु काही महाभाग यापेक्षा वेगळे निघतात. पुणे शहरात राहणाऱ्या एका जोडप्याने आपल्या मुलीस ओळखीच्या लोकांना विकले. मुलगी दत्तक देत असल्याचे स्टॅप पेपरवर लिहून दिले. मग ज्याने त्या मुलीस घेतले त्याने तिला भीक मागण्यास बसवले. एका वकिलाच्या जागृकतेमुळे हा प्रकार उघड झाला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे शहरातील एका दाम्पत्यास सहावी मुलगी झाली. मग त्यांनी त्या मुलीस फक्त दोन हजार रुपयांमध्ये परिचित व्यक्तीला विकले. विकत घेताना स्टँप पेपर तयार केला. त्यात मुलीला दत्तक देत असल्याचे लिहून दिले. कुठेही मुलीस विकत देत असल्याचे म्हटले नाही. त्या लोकांनी मुलीस विकले तेव्हा ती फक्त दोन वर्षांची होती. त्यानंतर ज्याने विकत घेतले त्याने त्या मुलीस भीक मागण्याच्या कामाला लावले. आता ती चार वर्षांची झाली आहे. त्या मुलीस विकण्याचा व्यवहार समाजातील पंच मंडळीच्या साक्षीने झाला होता.
त्या चार वर्षीय मुलीची कहाणी वकील शुभम लोखंडे यांना कळाली. त्यानंतर त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दत्तक घेणारे आणि आपल्या मुलीस विकणाऱ्या आई-वडिलांसह 11 जणांवर गुन्हा दाखल केला. भारतीय दंड विधान 363 अ, 370 (मानव तस्करी), 34 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले की, मुलगी विकणारे आणि विकत घेणारे एकमेकांना चांगलेच ओळखत होते. मुलीस दत्तक घेताना त्यांनी ५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून दिले होते. परंतु नोटरीमध्ये विक्री रक्कमेचा उल्लेख नव्हता. दत्तक घेण्याची एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेचे कोणतेही पालन त्यांनी केले नव्हते. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया बेकायदेशीर आहे.