पुणे | 1 सप्टेंबर 2023 : पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (PMPL) संचालकांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही महानगरपालिका मिळून नव्या शंभर बस खरेदी करणार आहे. तसेच डिझेलवर असणाऱ्या 200 बस सीएनजी वर आणण्यासाठी PMPL कडून लवकरच पावले उचलली जाणार आहे. यामुळे पुणे शहरातील प्रवाशांना चांगल्या बसेस मिळणार आहेत.
मावळ तालुक्यातील रिक्त असलेल्या 47 गावांतील पोलिस पाटील पदांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यात वडगावसह तळेगाव दाभाडे, खडकाळा, कुसगाव बुद्रूक, नवलाख उंब्रे आदी मोठ्या गावांची पदे आरक्षित झाली आहेत. आरक्षण सोडतीत सात गावांची पदे सर्वसाधारण वर्गासाठी तर तीन गावांची पदे सर्वसाधारण महिलांसाठी खुली राहिली आहेत.
पुणे शहरात लवकरच पीएमपीएलकडून दोन विना वाहक बस धावणार आहेत. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर पीएमपीएलची विनावाहक बस सेवा सुरु राहणार आहे. पुणे मनपा ते भोसरी मार्गावर विना थांबा सेवेला मिळणारा प्रतिसाद पहिल्यानंतर ही बससेवा इतर मार्गावर सुरु करण्यात येणार आहे. भोसरी ते पुणे मनपा आणि स्वारगेट ते हडपसर या दोन मुख्यमार्गांवर लवकरच विनावाहक बस धावणार आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग शुक्रवारी (१ सप्टेंबर) वाहतुकीसाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे. आज दुपारी 12 ते 2 या मार्गावर विशेष ब्लॉक असल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद ठेवणार आहे. या दोन तासांत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. या गॅन्ट्रीवर पुढच्या काळात सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. मुंबईवरुन पुणे शहराकडे येणाऱ्या लेनवर लोणावळा एक्झिटजवळ गॅन्ट्री बसली जाणार आहे. मेगा ब्लॉक दरम्यान हलकी वाहने जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे वळवली जाणार आहे तर अवजड वाहने खालापूर टोल नाक्यावर थांबवली जाणार आहेत.
पुणे शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी शनिवारी कालवा समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे. शहरात पाणीकपात करण्यासाठी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. पुणे शहरात पावसाने दडी मारल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने अद्याप भरलेली नाही. यामुळे पाणी कपातीचे संकट आहे. शनिवारी होणाऱ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील राहणार आहेत.