Pune News : पुणेकरांनो काळजी घ्या, डेंग्यूच्या रुग्णात वाढ, कोणत्या भागात सर्वाधिक रुग्ण
Pune News : पुणे शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे चिंता निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यासाठी आक्रमक भूमिका घेत काही जणांना दंडही केला आहे. डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

पुणे | 9 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात एप्रिल, मे, जून महिन्यात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे दिलासा मिळाला होता. परंतु त्यानंतर जुलै महिन्यात पाऊस सुरु होताच डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहे. आता सप्टेंबर महिन्यात पुणे शहरात डेंग्यूच्या (Dengue) संशयित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात चिंता निर्माण करणारी परिस्थिती आहे. पुणे शहरात आतापर्यंत 1 हजार 318 संशयित रुग्ण आढळले आहे. त्यात 96 रुग्णांमध्ये डेंग्यू आढळला आहे.
कोणत्या महिन्यात किती रुग्ण
पुणे शहरात एप्रिल ते जून या तीन महिन्यात डेंग्यू नव्हता. परंतु जुलै महिन्यात पाऊस सुरु होताच डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले. जुलै महिन्यात 225 संशयित रुग्ण आणि 18 डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. ऑगस्ट महिन्यात 512 संशयित रुग्ण आणि 47 रुग्ण आढळले होते. परंतु आता सप्टेंबर महिन्याच्या आठच दिवसांत 1 हजार 318 संशयित रुग्ण आढळले सापडले आहे. तसेच 96 रुग्णांमध्ये डेंग्यू आढळला आहे. यामुळे शहरात डेंग्यूचा कहर सुरु आहे.
कोणत्या विभागात सर्वाधिक रुग्ण
पुणे शहरात डेंग्यू वाढू लागला आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण ढोले पाटील आणि औंध-बाणेर या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आढळणार आहे. डासांची प्रजनन वेगाने वाढत असल्यामुळे डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे. तसेच घरात साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूचा आळ्या सापडू लागल्या आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपाने जोरदार मोहीम सुरु केली आहे.
डेंगूच्या आळ्या, नऊ लाखांचा दंड
पिंपरी चिंचवड मनपाने शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढल्यामुळे शोध मोहीम सुरु केली. त्यात साडेपाच हजार ठिकाणी डेंग्यूच्या आळ्या सापडल्या. ज्या ठिकाणी डेंग्यूच्या आळ्या सापडल्या त्या लोकांना नऊ लाखांचा दंड करण्यात आला आहे. डेंग्यू आजाराला आळा बसवण्यासाठी डासांची उत्पत्ती स्थानके नष्ट केली जात आहे. त्याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.
काय आहेत लक्षणे
डेंग्यूची लागन झाली म्हणजे सुरुवातीला ताप आणि अंगदुखी सुरु होते. तसेच शरीरावर पुरळ येतात. नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव सुरु होतो. मळमळ, उलटी आणि लघवीतून रक्त बाहेर पडते. सतत तहान लागणे आणि अशक्तपणा जाणवतो.