पुणे | 9 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील गणेशोत्सव देशातच नाही तर विदेशातही प्रसिद्ध आहे. यामुळे पुण्यात गणेश उत्सवानिमित्त विदेशातून पर्यटक येतात. यंदाच्या गणेश उत्सवासाठी पुणे पोलिसांनी डोळ्यात तेल घालून तयार केली आहे. पुणे शहरात काही दिवसांपूर्वी दहशतवादी सापडले होते. त्यानंतर पुणे शहरात दहशतवाद्यांची स्लीपर सेल असल्याचा तपास संस्थांना संशय आहे. यामुळे आता गणेश उत्सवात २४ तास लक्ष ठेवण्याच्या दृष्टिने पुणे पोलिसांनी तयारी केली आहे.
पुणे पोलिसांनी शहरातील गणेश मंडळांची बैठक घेतली. शहरातील 2,600 गणेशोत्सव मंडळांना मंडप आणि परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे सांगितले आहेत. यामुळे 24 तास प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे. तसेच पुणे शहरातील महत्वाचे रस्ते असलेले टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, लक्ष्मी रोड, केळकर रस्ता, एफसी रोज, जंगली महाराज रोज आणि लष्कर भागात सीसीटीव्ही लावण्यावर भर दिला आहे. या परिसरात असणाऱ्या व्यावसायिकांना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची विनंती केली आहे.
पुणे पोलीस प्रशासनाकडे 1800 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. स्मार्ट सिटी आणि राज्य गृह विभागाकडे ही यंत्रणा आहे. तसेच पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी राहणार आहे. पोलीस सुरक्षेसाठी होमगार्डची मदत घेणार आहे. पुणे शहरात ३ जुलै रोजी एनआयएच्या मोस्ट वॉटेंड दहशतवाद्यांच्या यादीतील इम्रान खान आणि मोहम्मद युनूस साकी यांना अटक करण्यात आली होती. त्यांचा संबंध इसिसशी असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे पोलिसांनी कठोर सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
पोलिसांनी गणेश मंडळांना काही सूचनाही केल्या आहेत. गणेश मंडळांनी कमानी तळाशी कापडाने झाकून ठेवू नये. या कमानी रस्त्याच्या पृष्ठभागापासून उघडी ठेवावी. कमानी उघडी राहिल्यास समाजविघातक व्यक्ती संशयास्पद वस्तू ठेवू शकतो. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. यंदाचा गणेश उत्सव निर्वघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांनी अशी तयारी आहे.