Pune News | पुणे गणेशोत्सवात मोबाईल चोरट्यांची ‘दिवाळी’, भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत
Pune News | पुणे शहरात गणेशोत्सव चोरट्यांची दिवाळी झाली. या काळात अनेकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. तसेच अनेकांनी तक्रारी दाखल केल्या नसल्याने ही संख्या कितीतरी अधिक असणार आहे.
पुणे | 1 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात गुन्हेगारी वाढली आहे. पुण्यात गणेशोत्सव काळात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसत आहे. या दरम्यान अनेकांचे मोबाईल चोरीला गेली आहेत. मोबाईल चोरीच्या तक्रारी आल्याची संख्या 1500 आहेत. तसेच अनेक नागरिकांनी मोबाईल चोरीच्या तक्रारीच नोंदवल्या नाहीत. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सर्वात जास्त मोबाईल चोरीला गेले आहेत. या दिवशी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी 800 मोबाईल लंपास केले आहेत. विश्रामबाग, फरासखाना, खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक तक्रारी आहेत. ज्या व्यक्तींचा मोबाईल चोरीला गेले आहे त्यांना पोलिसांकडून लॉस्ट अँड फाऊंड या पुणे पोलिसांच्या वेबसाईट वर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
भक्ष्याचा पाळलाग करता बिबट्या विहिरीत
पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत बिबट्यांचे वास्तव्य आहे. जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे रोहोकडी बिबटया विहिरीत पडल्याची घटना घडली. या परिसरात भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्याचा बछडा सुमारे 70 फूट खोल विहिरीत पडला. 3 महिने वयाच्या बिबट्याच्या बछड्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले. ओतूर वनविभागाच्या पथकाला यश आले. विहिरीत शिडी सोडून बिबट्याची सुटका करण्यात आली.
घोडधरण शंभर टक्के भरले
पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेले घोडधरण शंभर टक्के भरले आहे. यानंतर धरणातून 1 हजार क्युसेक्सने पाणी सोडले जात आहे. धरणातून घोड नदीच्या पात्रात विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच पाऊस जर असाच सुरू राहिला तर धरणातून विसर्ग अजून वाढवला जाण्याची शक्यता आहे.
बारामतीत रास्ता रोको होणार
बारामती तालुक्यातील लोणी भापकर व आसपासच्या 10 ते 12 गावातील लोकांनी मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाला आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. त्यासाठी 8 ऑक्टोबर रोजी बारामती रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य सरकारने मराठा समाजास शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय दिले नाही तर लढा तीव्र केला जाणार असल्याचा इशारा देण्यात आलाय.
पुणे घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला
मावळ तालुक्यात सहयाद्रीच्या पर्वत रांगेतील घाट माथ्यावर परतीच्या पावसाचा जोर वाढलाय आहे. त्यामुळे मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर धुक्याची दुलई दिसत आहे. या धुक्यात अमृतांजन ब्रिज हरवला आहे. धुक्यामुळे जलद गतीने एक्स्प्रेस वे वरुन धावणाऱ्या गाड्या संथ गतीने धावत आहे. तसेच धुक्याचा आनंद वाहन चालक घेत आहेत.