पुणे : कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांनी (Crime News) अनेक वेळा धडक कारवाया केल्या. या गँगचा म्होरक्यासह अनेक जणांना अटक केली गेली होती. या गँगमधील काही जणांवर मकोका लावण्यात आला आहे. काही जणांना हद्दपार केले आहे. कोयताची विक्री करताना आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. या सर्व उपायानंतरही कोयता गँगने डोके वर काढले आहे. कोयता गँगची शहरात दहशत सुरु आहे. आता शुल्लक कारणावरुन कोयता गँगने हल्ला केला आहे. त्यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
पुणे शहरातील धनकवडी परिसरात चहा पिताना झालेल्या चेष्टेतून वाद निर्माण झाला. हा वाद विकोपाला गेला. त्यातून दोघा भावांवर कोयत्याने वार करण्यात आले. ४ ते ५ जणांच्या टोळक्याने हा हल्ला केला आहे. या हल्यात ऋषी बर्डे अन् आदित्य बर्डे जखमी झाले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी आदित्य राजेंद्र बर्डे याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी ऋषी बर्डे अन् आदित्य बर्डे यांच्यांवर कोयत्याने वार केले. ऋषी आणि त्याचा भाऊ आदित्य हे भारती विद्यापीठ जवळ एका चहाच्या दुकानात त्यांच्या मित्रांसोबत चहा पीत होते. यावेळी आदित्यने सिद्धेश चोरघे याची मस्करी केली. मात्र या मस्करीचे रूपांतर वादात झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की सिद्धेश यांनी त्याच्या इतर साथीदारांना घेऊन आदित्य आणि ऋषी यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या प्रकरणी सिध्देश चोरघे, ओम सावंत, आदित्य गोसावी, राज परदेशी आणि सोन्या खुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोयत्याने झालेल्या या हल्यात ऋषी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना सुरु आहे. भाई-दादांचा रुबाबामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहे. यामुळे पोलिसांनी शाळांमध्ये समुपदेशन सुरु केले होते.