मुंबईतील कारवाईनंतर काही तासांत सांस्कृतिक पुण्यात कोट्यवधींचे एमडी ड्रग्स जप्त
Pune News : पुणे, मुंबई शहरात ड्रग्सचा व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. मुंबईनंतर पुणे शहरात कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
पुणे : पुणे शहराचे आकर्षण राज्यातील नाही तर देशभरातील लोकांना आहे. पुणे शहरातील चांगले वातावरण आणि शिक्षणामुळे अनेक जण या ठिकाणी आपली मुक्काम ठोकतात. परंतु एक चिंताजनक बातमी आली आहे. पुण्यात ड्रग्स (Md Drug) येत आहे. पोलिसांनी कोट्यवधीचे ड्रग्स जप्त केले आहे. पोलीस आता आरोपीने हे ड्रग्स कुठून आणलं याचा शोध घेत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.
कोणाकडून जप्त केले ड्रग्स
पुणे जिल्ह्यातील खराडी परिसरात पोलिसांनी दोघांकडून 1.21 कोटी रुपयांचा मेफेड्रोन (एमडी) जप्त केला आहे. पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील रतलाम येथून दोन जण पुण्यात आले होते. त्यांच्याकडून 1.21 कोटी रुपयांचे 108 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईत झाली कारवाई
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलच्या वरळी, घाटकोपर आणि वांद्रे युनिटने अमली पदार्थ तस्करांवर मोठी कारवाई केली आहे. पथकाने गोरेगाव आणि माहीम परिसरातून पाच ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 40 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
काय असते मेफेड्रोन पार्टीतील ड्रग्स
हे ड्रग्ज मिथाइलीनन डायऑक्सी, मथैमफेटामाईन आणि मेफेड्रोन अशा वेगवेगळ्य नावांनी ओळखले जाते. प्रत्येक देशात याची वेगवेगळी कोड नावे आहेत. हे ड्रग्स श्वासातून किंवा पाण्यातून घेतले जाते. नशेच्या बाजारात याच्या एक ग्रॅमची किंमत 25 हजार रुपये इतकी आहे. नशा करणाऱ्यांत या ड्रग्जची वेगवेगळी नावेही आहेत. हे ड्रग्ज घेतल्यानंतर मेंदूत नशा चढते, धुंदी येते. मोठ्या प्रमाणात आणि स्तात्याने हे घेतल्याने जीवाला धोका होण्याचीही शक्यता असते.
म्याऊ म्याऊ ड्रग्स म्हणूनही परिचित
मेफेड्रोनला साधारणपणे म्याऊ म्याऊ ड्रग्ज नावाने ओळखले जाते. रेव्ह पार्ट्यांत या ड्रग्सचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हे ड्रग्स अफगाणिस्थान आणि नायजेरियात जास्त प्रमाणात तयार करण्यात येते. पार्टी ड्रग्ज म्हणून याचा वापर देशातही करण्यात येतो. रेव्ह पार्टीत यापूर्वी एलएसडी, लिसर्जिक एसिड डायइथाइम अमाइडचा वार करण्यात येत होता. मात्र त्यानंतर याबाबत कठोर कायदे आल्यानंतर मेफेड्रोनचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला आहे.