Pune Flights : पुणे शहरातील लोकांसाठी चांगली बातमी, आता नवीन शहराला थेट विमानसेवा?
Pune Flights : पुणे शहराचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे पुणे शहरातून देशाच्या अनेक भागांत थेट विमानांची सेवा सुरु केली जात आहे. पुण्यात विमानांची संख्या वाढल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढणार आहे. आता नवीन अनेक शहरात पुण्यावरुन थेट जाता येणार आहे.
पुणे | 17 ऑगस्ट 2023 : पुणे शहराचा विकास वेगाने होते आहे. त्यामुळे पुणे शहरात पायाभूत सुविधाही निर्माण केल्या जात आहे. पुणे लोहगाव विमानतळसोबत पुरंदर विमानतळाची चर्चा सुरु झाली आहे. तसेच पुणे शहरातून लोहगाव विमानतळावरील रन वे लायटिंगचे काम पूर्ण झाले आहे. त्याचा फायदा म्हणजे या ठिकाणावरुन २४ तास विमान वाहतूक शक्य झाले आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विमानांच्या फेऱ्या वाढवल्या जात आहेत. पुणे शहरातून अनेक नवीन शहरात विमानसेवा सुरु झाली आहे. त्यात आणखी एका मेट्रो शहराची भर पडणार आहे.
जून महिन्यांत या विमानफेऱ्या झाल्या सुरु
जून महिन्यात पुणे विमानतळावरुन नवी दिल्ली, नागपूर, जोधपूर, अहमदाबाद, बंगळुरु या शहरांसाठी विमानांची संख्या वाढवली गेली. गो फस्ट या कंपनीकडून नवी दिल्ली, बंगळुरु, नागपूरसाठी सात विमानफेऱ्या सुरु केल्या गेल्या होत्या. त्यानंतर जुलै महिन्यापासून राजकोट, वडोदरा या शहरांतही विमानसेवा सुरु झाली. आता पुणे शहरावरुन भोपाळसाठी सेवा सुरु होणार आहे.
या सेवा सुरु
भोपाळच्या राजा भोज इंटरनेशनल एयरपोर्टवरुन आकाश कंपनीकडून पुणे-भोपाळ सेवा सुरु होणार आहे. पुणे शहरातून सध्या दररोज 178 ते 184 विमानाचे आगमन अन् प्रस्थान होते. पुणे लोहगाव विमानतळावर 5 लाख चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळावर उभारले गेले आहे. अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले इंटिग्रेटेड टर्मिनल या ठिकाणी बांधले गेले आहे. यामुळे एक कोटी प्रवासी पुणे विमानतळावर दरवर्षी जाऊ शकतात. पुणे शहर देशातील विविध भागांशी हवाई सेवेने जोडले जात असल्यामुळे शिक्षण आणि उद्योगांसाठी येणाऱ्या लोकांना फायदा होणार आहे.
पुरंदरवर विमानतळ लवकरच
पुणे शहरात नुकतेच चांदणी चौक पुलाचे उद्घघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पुण्याच्या विकासावर यावेळी चर्चा झाली. तसेच पुणे पुरंदर विमानतळाच्या कामाला वेग देण्याबाबत चर्चा झाली. यामुळे पुण्याला लवकरच दुसरे विमानतळ मिळण्याची शक्यता आहे.