पुणे शहरातील पाणी पुरवठासंदर्भात चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय, प्रशासनाला दिले आदेश
Pune News : पुणे शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणांमधील जलसाठा वेगाने कमी होत आहे. यामुळेच पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट आहे. यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निर्णय जाहीर केला आहे.
पुणे : एकीकडे ऐन उन्हाळ्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असताना दुसरीकडे मात्र राज्यातील अनेक शहरांमध्ये पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांचा साठा वेगाने कमी होत आहे. यामुळे पुणे शहरावर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. यंदा एल निनोमुळे मॉन्सून (Monsoon) लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच जून-जुलै महिन्यांत समाधानकारक पाऊस पडणार नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुणेकरांना आतापासून उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
काय आहे निर्णय
पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यातील २६ धरणांपैकी २१ धरणांमधील जलसाठा घसरला आहे. हा जलसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे पुढील चार महिन्यांचे योग्य नियोजन करावे लागणार आहे. पुणे जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात उजनीसह लहान मोठ्या एकूण २६ धरणांतील उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १९८.३४ टीएमसी आहे.
यंदा या धरणांमध्ये २०२.६७ टीएमसी म्हणजेच १०२ टक्के जलसाठा झाला होता. परंतु पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे धरणांत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी साठा शिल्लक आहे. यामुळे पाणी कपातीची पुणेकरांवर टांगती तलवार होती मात्र पाणी कपात न करण्याचे आदेश पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
नागरिकांना केले आवाहन
पुणे शहरासाठी पाणी कपात होणार नाही. परंतु जलसाठा कमी होत असल्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पुण्यातील नागरिकांना चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली होती. यामध्ये 15 मे नंतर पाणी कपातीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. परंतु आता पाणी कपात होणार नसल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.