राज्यात प्रथमच पुणे शहरात सुरु होणार असा प्रकल्प, पुराचे पाणी वाढल्यास मिळणार अलर्ट
Pune News : पुणे शहरासाठी नवीन प्रकल्प सुरु होणार आहे. यामुळे शहरात पुराचे पाणी वाढल्यास अलर्ट मिळणार आहे. राज्यात प्रथमच असा प्रकल्प सुरु होता आहे. त्याचा फायदा होणार आहे.
पुणे | 18 जुलै 2023 : राज्यात अजून पुरेसा पाऊस सुरु झाला नाही. परंतु आगामी काही दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. एकाच दिवसांत मुसळधार झालेल्या पावसामुळे शहरात बिकट परिस्थिती निर्माण होते. नदी, नाल्यांना पूर येते. सखल भागात पाणी साचते. घरांमध्ये पाणी जाते. नागरिकांचे मोठे नुकसान होते. परंतु आता पुणे महानगरपालिका नवीन प्रणाली विकसित करणार आहे. त्यामुळे पूर आल्यास अलर्ट मिळणार आहे.
काय आहे प्रणाली
पुणे महानगरपालिका सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग सेंटरच्या म्हणजे सी-डॅककडून नवीन प्रणाली विकसित करुन घेण्याचा कामास सुरुवात केली आहे. यामुळे नदी, नाल्यांना पूर आल्यास अलर्ट मिळणार आहे. या प्रणालीसाठी काम सी-डॅकने सुरु केले आहे. पहिल्या टप्प्यासाठी आंबिल ओढ्याची पथदर्शी प्रकल्प म्हणून निवड केली आहे.
काय केला अभ्यास
सी डॅकने या प्रणालीसाठी १०० वर्षांतील पावसाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. शहरातील नदी, नाल्यांना पूर केव्हा येतो, किती मीमी पाऊस झाला म्हणजे नदी, नाले वाहू लागतात याची अभ्यास केला गेला. त्यानंतर ६० ते ६५ मिमी पाऊस झाल्यास नाले अन् गटारी वाहू लागतात, असे स्पष्ट झाले. यामुळे नाल्यांवरच सतर्कता प्रणाली विकसित करण्याचे काम करण्यात आले.
काय होणार फायदा
सी-डॅककडून पुणे महापालिकेला नवीन प्रणाली विकसित करण्यासाठी मदत मिळाली आहे. या प्रणालीमुळे शहरातील पुराचे नुकसान कमी होणार आहे. तसेच अलर्ट मिळाल्यामुळे महानगरपालिकेला पुरेसा वेळ मिळणार आहे. त्या वेळेत बचावकार्य करता येणार आहे. राज्यात प्रथमच असा प्रकल्प पुणे महानगरपालिकेकडून केला जात आहे.
पुणे शहरातील हा प्रकल्प यशस्वी झाल्यास त्याची अंमलबजावणी राज्यातील इतर शहरांमध्ये करता येणार आहे. सध्या पुणे शहरातील एका नाल्यावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यानंतर टप्याटप्याने इतर ठिकाणी त्याचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाचा किती खर्च आहे, त्याची माहिती अद्याप समोर आली नाही.