पुणे | 17 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात काही दिवसांपूर्वी महाविद्यालयीन युवतीवर कोयत्याने हल्ला झाला होता. पुणे शहरातील पेरुगेट पोलीस चौकीजवळ भर दिवसा झालेल्या या प्रकारामुळे खळबळ माजली होती. या प्रकारसंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला होता. एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा खून झाला होता. आता एकतर्फी प्रेमाचा प्रकार टिनएजर मुलांमध्ये समोर आला आहे. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. या प्रकारणात मुलीने धक्कादायक पाऊल उचलले आहे.
एक १८ वर्षीय युवक औंध भागात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीचा सतत पाठलाग करत होता. परंतु ती मुलगी त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हती. यामुळे त्याने त्या मुलीचे काही फोटो काढले. सोशल मीडियावर ते स्वत:ची पत्नी असल्याचे सांगत फोटो शेअर केले. मुलीस हा प्रकार समजल्यावर तिला धक्का बसला.
चतुश्रृंगी पोलीस (Chatushrungi Police) ठाण्याचे सहायक निरीक्षक बाबासाहेब जरेकर यांनी सांगितले की, मुलाने यामुळे धक्कादायक पाऊल उचलले. तिने स्वत:च्या घरात जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिच्या आईने पाहतच तिने धाव घेत तिला वाचवले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्या मुलासंदर्भात तक्रार दिली. यावरुन भादंवि 354 आणि 354-डी आणि पॉस्को एक्ट (POCSO Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणी त्या मुलाची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान त्या मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तिला या प्रकारामुळे प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.