माझं वय ६० वर्ष, ४० वर्षे मी पक्षासाठी काम केलं, मग आता लढणार नाही तर कधी? कोणत्या नेत्याने केला पक्षाला सवाल?
पक्षाने माझ्यावर अन्याय केला. माझं वय ६० वर्ष, ४० वर्षे मी पक्षासाठी काम केलं, मग आता लढणार नाही तर कधी? आता मी काँग्रेस भवनातही जाणार नाही. पक्षाला सांगून ठेवले आहे.
पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीची (Pune by elections) अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपलीय. मात्र आता काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी झालीय. भाजपलाही (BJP) हिंदू महासभेमुळे समविचारी बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. कारण कसब्यातून हिंदू महासंघाचे उमेदवार आनंद दवे यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून ऐनवेळी नाना काटे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे राहुल कलाटे नाराज झाले. त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
बाळासाहेब ठाम
कसब्यातून काँग्रेसचे बाळासाहेब दाभेकर (Balasaheb dabhekar) यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. आता आपण माघार घेणार नसल्याचे दाभेकर यांनी टीव्ही९ शी बोलताना स्पष्ट सांगितले. बाळासाहेब दाभेकर (Balasaheb dabhekar) म्हणाले, ‘ पक्षाने माझ्यावर अन्याय केला. माझं वय ६० वर्ष, ४० वर्षे मी पक्षासाठी काम केलं, मग आता लढणार नाही तर कधी? काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांच माझ्याशी बोलणं झालं नाही.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन आला होता पण मी त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे. मी कसबा पोटनिवडणूक लढवणारच आहे. आता मी माघार घेणार नाही. आता मी काँग्रेस भावनातही जाणार नाही. हा निर्णय मी पक्षाला देखील कळवला आहे’.
बंडखोरीचा भाजपला फायदा होणार?
रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाळासाहेब दाभेकर यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा भाजपला होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र टिळकांना उमेदवारी न दिल्याने या मतदार संघात ब्राह्मण समाज नाराज आहे. त्यामुळे टिळकांना उमेदवारी नाकारल्याने भाजपला फटका बसणार की महाविकास आघाडीत फूट पडल्याने भाजपला फायदा होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
काँग्रेससाठी दुसरी चांगली बातमी
पुण्यातून काँग्रेसची चांगली बातमीसुद्धा आहे. पक्षावर व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यांवर नाराज असलेले बाळासाहेब थोरात यांची नाराजी दूर झाली आहे. आता पुण्यात ते काँग्रेस पक्षाच्या प्रचारात सहभागी होणार आहे, अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली. मोहन जोशी म्हणाले की. बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणं झालं आहे. ते प्रचारात सहभागी होणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते प्रचार करणार आहे. 10 तारखेला अजित पवार पुण्यात मविआची बैठक घेणार आहे. आदित्य ठाकरेंचा पुण्यात रोड शो असणार आहे.