पुण्याच्या ग्रामीण भागात 91 कोरोना हॉटस्पॉट, आठवड्याभरात पुन्हा वाढ
ज्या गावात दहापेक्षा जास्त कोरोना बाधितांची संख्या आहे, ते गाव हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले जाते. सध्या खेड, जुन्नर आणि पुरंदर तालुक्यात हॉटस्पॉट्सची संख्या सर्वाधिक आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आलेला नाही. पंधरा दिवसांपूर्वी कमी झालेल्या हॉटस्पॉटच्या संख्येत 7 ने वाढ झाली आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यांत एकूण 91 हॉटस्पॉट गावे आहेत. (Pune Corona Hotspot increases to 91 in a week)
ज्या गावात दहापेक्षा जास्त कोरोना बाधितांची संख्या आहे, ते गाव हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले जाते. सध्या खेड, जुन्नर आणि पुरंदर तालुक्यात हॉटस्पॉट्सची संख्या सर्वाधिक आहे. मागील बारा दिवसांपूर्वी हॉटस्पॉट गावांची संख्या 84 इतकी होती. आज ही संख्या 91 वर पोहचली आहे.
कुठे किती हॉटस्पॉट?
खेड तालुक्यात 4 ने हॉटस्पॉट गावांची संख्या वाढली आहे. तर जुन्नर आणि पुरंदरमध्येही प्रत्येकी 5 ने वाढ झाली आहे. तर मावळ, हवेली, शिरुर, वेल्हा तालुक्यात हॉटस्पॉट्सच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले.
पुण्यात निर्बंध जैसे थे
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता येत्या आठवड्यात पुण्यात निर्बंधाची स्थिती जैसे थेच असणार आहे. पुणे शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे. त्यामुळे पुण्यातील कोव्हिड संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेले निर्बंध आणखी शिथिल होतील, अशी अपेक्षा पुणेकरांना होती. मात्र पुन्हा एकदा डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका बघता पुण्यात तूर्तास जे निर्बंध लागू आहेत ते पुढे लागू राहणार आहेत.
पुण्यात काय सुरु काय बंद?
- शनिवारी रविवारी केवळ अत्यावश्यक सुविधा (Essential Service) आणि हॉटेल्सची पार्सल सेवा सुरू राहणार
- पुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युटी पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील
- रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे शनिवार आणि रविवारी फक्त पार्सल सेवा/घरपोच सेवेसाठी रात्री 11 पर्यंत सुरू राहणार
- विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन करणार
- नाट्यगृहे, चित्रपटगृह बंदच राहणार
- 5 जून 2021 रोजीच्या आदेशातील अत्यावश्यक सेवेतील नमूद दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहणार
- कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे आणि त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालांची विक्री करणारे दुकाने, गाळे हे आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार
संबंधित बातम्या :
पुणेकरांना लॉकडाऊनमधून दिलासा नाही, सोमवारपासून काय सुरु काय बंद?
(Pune Corona Hotspot increases to 91 in a week)