अधिकाऱ्याचे ‘लेटर बॉम्ब’, मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
pune corporation officer letter bomb:
राज्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेले लेटर बॉम्ब प्रचंड गाजले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-मेल पाठवून त्यांनी 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्यातील राजकारणात भूकंप आला होता. आता पुन्हा एका अधिकाऱ्याने लेटर बॉम्ब टाकला आहे. पुणे येथील निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी सरळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहित खळबळजनक आरोप केले आहे. एका मंत्र्यांकडून नियमबाह्य कामांसाठी दबाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय आहे भगवान पवार यांच्या पत्रात
भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात आपण मागासवर्गीय अधिकारी असल्यामुळे हेतुपुरस्सरपणे त्रास देण्याच्या हेतूने निलंबन करण्यात आल्याचा दावा भगवान पवार यांनी पत्रात केला आहे. आहे. पत्रात म्हटले आहे की, मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे व इतर कामामध्ये मदत करण्यासाठी दबाव आणला होता. परंतू मी नियम बाह्य कामात मदत केली नाही व इतर नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून माझे निलंबन करण्यात आलेले आहे.
जुन्या तक्रारीसाठी समिती
निलंबनासंदर्भात मी मॅटमध्ये दावा दाखल केला आहे. परंतु माझी मानसिक छळवणूक सुरु केली होती आणि पुणे मनपात प्रमुख आरोग्य अधिकारी हे पद रिक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. त्यासाठी जुन्या तक्रारीच्या अनुषंगाने २९/०४/२०२४ रोजी चौकशी समिती स्थापन करुन चौकशी न करताच घाई गडबडीत मंत्र्यांना अपेक्षित अहवाल मिळवला. त्यानंतर मला निलंबित करण्यात आलेले आहे. माझे निलंबन हे मंत्री महोदय यांच्या दबावामुळे केलेले आहे, असा दावा पत्रात भगवान पवार यांनी केला आहे.
निलंबनामुळे माझे मनोधैर्य खचून गेले असून माझे कुटूंब मानसिक तणावामध्ये आहे. निलंबन करताना माझे म्हणणे सादर करण्याची कोणतीही संधी मला दिली नाही. निलंबन मागे घेण्याची मागणी भगवान पवार यांनी पत्रात केली आहे. आता या पत्रानंतर नियमबाह्य कामे सांगणारा मंत्री कोण? यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे.