Pune Crime News : चक्क सासऱ्याकडून जावयाचे अपहरण, काय आहे कारण
Pune Crime News : पुणे शहरात जावई आणि सासऱ्याच्या नात्यासंदर्भात एक वेगळाच प्रकार घडला आहे. चक्क सासऱ्याने जावायाचे अपहरण केले आहे. या प्रकरणाची तक्रार जावयाने पोलिसात केली आहे. परंतु मारहाणीचे काय आहे कारण...
पुणे | 9 सप्टेंबर 2023 : काही दिवसांपूर्वी धोंड्याचा महिना गेला. या महिन्यात जावयाला वाण देण्याची प्रथा आहे. जावई, मुली आणि नातवांना बोलवून वाण दिले जाते. जावयाच्या थाट असणाऱ्या या महिन्यानंतर श्रावण सुरु झाला अन् पुणे शहरात वेगळाच प्रकार घडला. या ठिकाणी सासऱ्याने आपले अपहरण केल्याचा आरोप जावयाने केला. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारामुळे पोलीसही अचंबित झाले आहे.
काय घडला प्रकार
पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्यात एक विनोद साहेबराव आडे यांनी फिर्यादी दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ते नोकरीनिमीत्त पत्नी आणि एका वर्षाच्या मुलीसह येरवडामध्ये राहतात. त्यांच्या पत्नीने जुलै महिन्यात सोन्याचे मंगळसूत्र मागितले. परंतु तिची समजूत काढली. त्यानंतरही तिने आपला हट्ट सोडला नाही. ती विनोद आडे यांनाच शिवीगाळ करु लागली. हाताला चिमटे घेत होती. त्यानंतर तीन सप्टेंबर रोजी पुन्हा वादविवाद केला. तिने आपल्या माहेरी फोन करत विनोद मारहाण करत असल्याचे म्हटले.
मग असे काही घडले
विनोद आडे यांचे सासरे प्रकाश गेमा राठोड, चुलत सासरे रमेश राठोड, दादासाहेब राठोड आणि मामा सासरे योगेश वडते, मंगेश वडते हे त्यानंतर बीडवरुन आले. त्यानंतर त्यांनी विनोद यांना जबरदस्तीने गाडीत कोंबले. त्यांना बीड जिल्ह्यातील गेवराई येथे नेले. त्याठिकाणी लाथा-बुक्क्याने मारहाण केली. विनोद आडे यांची जमीन पत्नीच्या नावावर करण्यास सांगितले. तीन दिवस गोठ्यात बांधून ठेवले. त्यानंतर सहा तारखेला सोडून दिले.
पुणे शहरात आल्यावर गुन्हा दाखल
बीड जिल्ह्यातून विनोद आडे तातडीने पुण्यात आले. त्यांनी पुणे गाठल्यानंतर येवरडा पोलिसात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस येरवडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक होले करत आहेत.