गुन्हाही दाखल नव्हता, पण वर्षभरापूर्वी नातेवाईकांनी केलेल्या खुनाचा पोलिसांना कसा लागला शोध?
Pune Crime News : पुणे पोलिसांनी एका खुनाचे रहस्य उलगडले आहे. विशेष म्हणजे या खुनासंदर्भात कोणताही गुन्हा दाखल नव्हता. नातेवाईकांनी परस्पर अंत्यसंस्कार केले होते. परंतु पोलीस आरोपीपर्यंत पोहचलेच.
पुणे | 27 जुलै 2023 : पुणे पोलिसांनी एका दाखल न झालेल्या गुन्हाचा शोध लावला आहे. या प्रकरणातील मयत व्यक्तीवर परस्पर अंत्यसंस्कारही झाले होते. वर्षभरापूर्वी झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हा खून संपत्तीच्या वादातून नातेवाईकांनीच केला होता. या प्रकरणातील आरोपींनी खून केल्याची कबुलीही दिली आहे. पोलिसांना मिळालेल्या एका पुराव्यावरुन या खुनाचे रहस्य उलगडले.
काय आहे प्रकार
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात वरवंड गावी एका ७७ वर्षीय सुरेश गांधी यांचा खून झाला होता. परंतु त्यांचा खून न दाखवता बाथरुममध्ये पडून निधन झाल्याचे सांगितले गेले. त्यानंतर त्यांच्यावर गेल्या वर्षी मार्चमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल नव्हता. परंतु पोलिसांना यासंदर्भात एक व्हिडिओ क्लिप मिळाली. त्यानंतर प्रकरण समोर आले.
पोलिसांनी असा घेतला शोध
पोलिसांना या खून प्रकरणातील एक व्हिडिओ क्लिप मिळाली. त्यानंतर त्या क्लिपची पोलिसांनी बारकाईने तपासणी केली. त्या तपासणीनंतर पोलिसांनी मुख्य संशयित राकेश भंडारी (40) यांच्यासह चार जणांना अटक केली. त्यात अतुल जगताप (४५), प्रणव भंडारी (२२) आणि विजय मांडले (२५, सर्व रा. वरवंड) यांचा समावेश आहे. राकेश याने चौकशीत खुनाची कबुली दिली.
राकेशने दिली कबुली
गांधी आणि राकेश भंडारी यांच्यात अनेकवेळा वादा झाला होता. राकेश भंडारी हा त्यांचा जावाई होता. ते त्याला सांगत होते की, माझी तीन एकर जमीन मी मुलीऐवजी इतर नातेवाईकाला देईल. त्यामुळे राकेश याने त्यांना संपवण्याचा कट रचला. इतर तिघांच्या मदतीने त्याने हा खून केला.