नग्न व्हिडीओ फेसबुक फ्रेण्ड्सना पाठवण्याची धमकी, पुण्यात 150 हून अधिक तरुण जाळ्यात
पुण्यात 150 हून अधिक जणांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. यामध्ये श्रीमंत कुटुंबातील मुलं, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक अशा सर्वच स्तरातील व्यक्तींचा समावेश आहे (Pune Crime Sextortion blackmail )
अश्विनी सातव डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे : नोकरदार तरुणाई मोठ्या प्रमाणावर सेक्सटॉर्शनची (Sextortion) शिकार होत असल्याचं उघड झालं. पुणे सायबर पोलिसांत या प्रकरणी दोन गुन्हे तर 150 तक्रारी दाखल झाल्या आहेत. नग्न व्हिडीओ शूट करुन तो फेसबुक फ्रेण्ड्सना पाठवण्याची धमकी देत तरुणांकडून पैसे उकळले जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. (Pune Crime Sextortion increases as Men blackmail in Honey Trap Nude Video threaten to send to Facebook Friends)
सोशल मीडियावर ओळख करायची, हळूहळू मैत्री जुळवून या मैत्रीचे भावनिक नात्यात रुपांतर करायचे. त्यानंतर ब्लॅकमेलिंग करुन पैसे उकळायचे अशी मोडस ऑपरेंडी वापरल्या जाणाऱ्या घटना वारंवार समोर येत आहेत. पोलिसांच्या माध्यमातून वेळोवेळी जनजागृती आणि आवाहन देखील करण्यात येत आहे. पोलिसांच्या तपासात काय ते समोर येईलच मात्र पुण्यातील घटना गंभीर आहेत.
नेमकं काय घडलं?
लॉकडाऊन काळात घरी असताना पुण्यातील एका तरुणाला फेसबुकवर अनोळखी मुलीची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली होती. गप्पा झाल्यानंतर थेट व्हॉट्सअॅप नंबर शेअर झाले. हळूहळू व्हिडीओ कॉलवर बोलणं होऊ लागलं. नंतरच्या काळात त्या मैत्रिणीने त्याला नग्न होण्यास सांगितलं. यानेही प्रतिसाद दिला. नंतर थेट तोच व्हिडीओ तरुणाच्या व्हॉट्सअॅपला येऊन धडकला आणि पैशांची मागणी होऊ लागली.
अश्लील व्हिडीओ फेसबुक फ्रेण्ड्सना पाठवण्याची धमकी
पैसे देण्यास नकार दिल्यास तुझ्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या प्रत्येकाला हा व्हिडीओ शेअर करण्याची धमकीही देण्यात आली. हे फक्त एक प्रातिनिधीक उदाहरण आहे. पुण्यात 150 हून अधिक जणांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. यामध्ये श्रीमंत कुटुंबातील मुलं, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक अशा सर्वच स्तरातील व्यक्तींचा समावेश आहे. भीती आणि बदनामीमुळे अनेक जण पैसे देऊन मोकळे झाले. पुणे सायबर पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलीस दोन आरोपींच्या मागावर असून लॉकडाऊन संपताच दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान येथे कारवाईसाठी जाणार आहेत.
संबंधित बातम्या :
फेसबुकवरुन ओळख, हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या तरुणीची मुंबईत गळा दाबून हत्या
(Pune Crime Sextortion increases as Men blackmail in Honey Trap Nude Video threaten to send to Facebook Friends)