दिलीप वळसे पाटील यांचा गौप्यस्फोट, मी राजीनामा देणार होतो, पण शरद पवार यांनी थांबवले
sharad pawar and dilip walse patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील महिन्यात बंड झाले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी वेगळा गट तयार करत शरद पवार यांची साथ सोडली. त्यानंतर आता दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलेय.

अभिजित पोते, पुणे | 12 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी बंड झाले होते. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत शिवसेना, भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार गेले. शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे दिलीप वळसे पाटील हे सुद्धा शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार गटात सहभागी झाले. आता दिलीप वळसे यांनी गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील
अजित पवार यांच्या गटात दाखल झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. परंतु शरद पवार यांनीच दिलीप वळसे पाटील यांना राजीनामा देण्यापासून रोखले, असे स्पष्टीकरण दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. राजीनामा हा वैयक्तिक प्रश्न आहे, पण साहेबांनी मला काम करायला सांगितले हे खरे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
बैठकीला दाखल
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दिलीप वळसे पाटील प्रथमच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (VSI ) बैठकीसाठी शनिवारी दाखल झाले. बैठकीसाठी आलेल्या दिलीप वळसे पाटील यांचे स्वागत शरद पवार यांनी केले. शरद पवार VSI चा आढावा या बैठकीत घेणार आहेत. बैठकीला जयंत पाटील, राजेश टोपे देखील उपस्थित राहणार आहेत.




अजित पवार यांची अनुपस्थिती
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला अजित पवार गटातून दिलीप वळसे पाटील दाखल झाले आहे. परंतु स्वत: अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. अजित पवार चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटन समारंभाला गेले आहे. यामुळे ते या बैठकीसाठी आले नसल्याचे सांगण्यात आले.
…तर दुसऱ्यांदा आले असते एका व्यासपीठावर
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवार आणि अजित पवार १ ऑगस्ट रोजी व्यासपीठावर एकत्र आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला गेला, त्या समारंभात ते एकत्र होते. आज पुन्हा हे दोन्ही नेते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त एकत्र आले असते. परंतु अजित पवार बैठकीला येत नसल्याने ही सार्वजिनक भेट टळली.