पुणे, दिनांक 14 जुलै 2023 : राज्यातील राजकारणात गेल्या पंधरा दिवसांपासून मोठे बदल झाले. २ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार करत उपमुख्यमंत्रीपद पटकवले. त्यानंतर अजित पवार यांना हवे असलेले अर्थ अन् नियोजन खाते त्यांना मिळाले. त्यांना हे खाती देऊ नये, असा दबाव शिवसेनेकडून होता. परंतु अखेर त्यांना ती खाती मिळाली. आता त्यांचे लक्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे. परंतु अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यामुळे खाते वाटपानंतर पालकमंत्री पदावरुन वाद रंगणार आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे आहे. परंतु आता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांना हवे आहे. त्यांनी खातेवाटपात पहिली लढाई जिंकली आहे. शिवसेनेच्या विरोधानंतर त्यांना अर्थखाते मिळाले. आता पुण्याचे पालकमंत्री ते होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुणे पालकमंत्री पदावरुन भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरु झाली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांचा अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यास विरोध आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेतृत्व काय निर्णय घेणार? हा प्रश्न आहे.
पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी अन् भाजप दोन्ही पक्ष प्रभावी आहेत. पुणे जिल्ह्यात भाजप आमदार आणि नगरसेवकांची संख्या जास्त आहे. पालकमंत्री पद ज्याच्याकडे असेल त्या पक्षांची अनेक कामे होतात. यामुळे पुणे जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठी पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे ठेवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांना दिल्यास भाजप बॅकफूटवर जाईल, असे कार्यकर्ते उघडपणे बोलत आहेत.
पुणे जिल्ह्यात चंद्रकांत दादा पाटील अन् अजित दादा पवार आहेत. या दोन्ही दादांपैकी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे दादा कोण होणार? याकडे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.