प्रदीप कापसे, पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राष्ट्रवादीत जणू भूकंप आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय अमान्य केला आहे. शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची वारंवार विनंती करण्यात येत आहे. पक्षाचे सर्वच नेते राजीनामा मागे घ्या म्हणून शरद पवार यांना आग्रह धरत आहेत. परंतु यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन केले. आता पुणे जिल्ह्यातील आमदाराने शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
कोणी दिले समर्थन
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. अजित पवार यांनी मंगळवारी शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन करत चार बोल कार्यकर्त्यांना सुनावले होते. अजित पवार यांच्या भूमिकेचे आमदार दिलीप मोहिते यांनी समर्थन केले आहे. आमदार मोहिते म्हणाल की, काल शरद पवार साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. नवीन नेतृत्वाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. नवीन नेतृत्व पक्षाने तयार केलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. शरद पवार यांनी निवृत्त घेऊ नये, असे असं कार्यकर्त्यांना वाटतं साहजिकच आहे. परंतु शरद पवार यांनी विचार करून निर्णय घेतला असेल. नेत्यानं घेतलेला निर्णय कार्यकर्त्यांनी स्वीकारला पाहिजे.
काय म्हणाले होते अजित पवार
सगळ्याचा भावना साहेबांनी ऐकल्या. पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही, असा गैरसमज तुम्ही करुन घेत आहेत. परंतु आज काँग्रेसचे अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन खरगे, पक्ष चालला आहे सोनियाजींच्या नावावर. पवार साहेबांचा वयाचा विचार करता नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल.
साहेब अध्यक्ष असो किंवा नसो, असाच परिवार जात राहील. साहेब आहेतच ना, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन अध्यक्ष होणार आहे. साहेबांच्या जीवावर राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे. साहेबांचा निर्णय एक धक्का आहे. पण साहेब आपल्या निर्णयावर ठाम आहेत. साहेबांच्या मार्गदर्शनखाली पक्ष चालणार आहे. साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको? या शब्दांत चार खडे बोल कार्यकर्त्यांनी सुनावले. नवीन येणारा अध्यक्ष साहेबांशी चर्चा करुन निर्णय घेईल. साहेब काल निर्णय जाहीर करणार होते. परंतु काल महाविकास आघाडीची सभा होती. त्यामुळे हा निर्णय आज जाहीर केला.
हे ही वाचा
सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, १५ दिवसांत दोन राजकीय स्फोट, पहिला झाला दुसरा कोणता?