Pune News | एका विद्यार्थ्यास शिकवण्यासाठी शिक्षिकेचा रोज 45 किलोमीटर प्रवास
pune zilla parishad education | राज्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करण्याससंदर्भात चर्चा सुरु आहे. शिक्षकांचा या निर्णयास विरोध आहे. त्याचवेळी एका विद्यार्थ्यासाठी रोज 45 किलोमीटर प्रवास शिक्षिका करत आहे.

पुणे | 3 ऑक्टोंबर 2023 : राज्यातील शिक्षण क्षेत्रात सध्या प्राथमिक शाळांचा मुद्दा चर्चेत आहे. प्राथमिक शाळेत वीस पेक्षा कमी पटसंख्या असले तर त्याशाळा बंद करुन इतर शाळांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. यासंदर्भात प्रस्ताव देण्याचे निर्देश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. शासनाच्या या निर्णयास शिक्षकांनी विरोध केला आहे. तसेच राजकीय पक्षांकडूनही याला विरोध होत आहे. परंतु पुणे जिल्ह्यात एका विद्यार्थ्यासाठी रोज 45 किलोमीटर प्रवास शिक्षिका करत असल्याची बाब समोर आली आहे.
पुणे जिल्ह्यातील आहे शाळा
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या शाळेतील मंगला धावले या शिक्षिकेचा हा प्रवास आहे. त्या सिया शेलार या पहिलीतील विद्यार्थीनीस शिकवण्यासाठी रोज प्रवास करत आहे. हा प्रवास 45 किलोमीटरचा आहे. पुणे जिल्ह्यात असलेल्या अटलवाडी या गावात त्या शिकवण्यासाठी जातात. पुणे जिल्ह्यात एकूण 3,638 प्राथमिक शाळा असून 21 शाळा अशा आहेत, ज्या ठिकाणी एक शिक्षक आहेत.
रोज 45 किलोमीटर प्रवास
मंगला धावले पुणे शहराजवळ पती आणि दोन मुलांसोबत राहतात. रोज 45 किलोमीटर प्रवास करुन एका मुलीस शिकवण्यासाठी त्या शाळेत पोहचतात. त्याचे पतीही शिक्षक आहेत. पतीही सकाळीच शाळेत जातात. 12 वर्षांची मुलगी शाळेत जाते आणि पाच वर्षाच्या मुलास डे केयर मध्ये सोडून त्या शाळेत जातात. तसेच त्या ज्या गावात शिकवण्यासाठी जातात त्या ठिकाणी नेटवर्क नाही. त्यामुळे अटलवाडीत गेल्यावर परिवाराशी संपर्कही तुटतो.
विद्यार्थीनीस बस किंवा रिक्षाची सोय दिल्यास
मंगला धावले इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाल्या की, वेल्हा तालुक्यातील पानशेतमध्ये शाळा आहे. ही शाळा अटलवाडीपासून जवळ आहे. सियासारख्या मुलांसाठी बस किंवा इतर सुविधा झाली तर त्यांना शाळेत जात येईल. कारण एक शिक्षक सर्व विषय शिकवू शकत नाही. राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात शाळा आहेत. राज्यातील 14 हजार 783 शाळेत 20 पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी आहेत. त्यामुळे या शाळा बंद होणार की काय? अशी परिस्थिती आहे.