सुनिल थिगळे, खेड, पुणे : पुणे जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आलीय. जिल्ह्यातील खेड पंचायत समितीमधील बांधकाम विभागातील शाखा अभियंताचा संशयास्पद मृतदेह सापडला आहे. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला? त्यांचा खून झाला की त्यांनी आत्महत्या केली? हे सर्व प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी पोलीस तपासानंतर सत्य समोर येणार आहे. परंतु या पंचायत समितीतील एक भ्रष्टाचार प्रकरण गेल्या काही दिवासांपासून गाजत होते. त्याचा संबंध शाखा अभियंत्याच्या मृत्यूशी आहे का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
खेड पंचायत समितीत बी. एस. शिंदे हे शाखा अभियंता आहेत. त्याचा मृतदेह सापडला आहे. १४ मार्च रोजी बी.एस. शिंदे हे पंचायत समितीतील एका कर्मचाऱ्यासोबत गेले. ते कार्यालयामधून बाहेर पडले. मात्र बराच वेळ होऊन देखील ते परत आलेच नाहीत. त्यानंतर संबधित कर्मचारी आणि शिंदे यांच्या कारचालकाने त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन लागला नाही. त्यानंतर यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आली.
शोध केला सुरु
शिंदे यांचा शोध घेत असताना राजगुरुनगर शहरापासून काही अंतरावर वनविभागाच्या हद्दीत त्यांचा मृतदेह आढळला. शिंदे यांच्या मृतदेहावर कोणतीही मारहाणीची खून नव्हती. त्यामुळे शिंदे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, याबाबतचे गूढ निर्माण झालं आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास केला जात असून मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अभियंत्याच्या मृत्यूचं कारण समोर येण्याची शक्यता आहे.
आत्महत्या की हत्या
शिंदे यांचा मृतदेह सापडल्याच्या घटनेमुळे प्रशासनासह तालुक्यात खळबळ उडली. खेड पंचायत समितीच्या बांधकाम विभागात वाकळवाडी गावातील एका कामात भ्रष्टाचार झाल्याचा मोठा गाजावाजा झाला होता. काम न करताच कामाचे बिल काढल्याचे उघड झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेला आले होते.त्यातच बांधकाम अभियंता शिदे यांचा संशयास्पद मृतदेह सापडल्यामुळे खेड पंचायत प्रशासन हादरले.