पुणे | 25 जुलै 2023 : भारत कृषीप्रधान देश आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना शासनाकडून राबवल्या जातात. शेतीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करुन देण्याची सरकारची जबाबदारी असते. परंतु सरकारकडून वर्षानुवर्षे पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात नाही. या प्रकारामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकरी महिलेने नवीन फंडा अवलंबला आहे. शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यासाठी अनुदानाची मागणी शासनाकडे केली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील निमोणे येथील शेतकरी लताबाई भास्कर हिंगे यांचे शेत आहे. परंतु त्यांच्या शेतापर्यंत रस्ता नाही. हा रस्ता तयार करण्याची विनंती करणारा अर्ज त्यांनी दिला होता. त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळाची जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु अजूनपर्यंत अधिकारी पाहणी करण्यासाठी आले नाही. त्यामुळे रस्ता तयार होणे लांबच आहे.
लताबाई हिंगे यांनी अनेकवेळा तहसीलदरांचे आदेश घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेट दिला. त्यांच्याशी चर्चा केली. परंतु त्यानंतरही एकही जण रस्ता पाहण्यासाठी आला नाही. यामुळे हेलिकॉप्टर खरेदी केल्यास रस्त्याने न जात सरळ हेलिकॉप्टरने शेतात जात येणार आहे.
लताबाई हिंगे यांच्या शेतापर्यंत रस्ता नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. रोज शेतात जाताना बिकट प्रवास करावा लागतो. शेतमाल आण्यासाठी अनेक आव्हानांना समोरे जावे लागते. यामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी करणार अर्ज त्यांनी शिरूर येथील तहसीलदारांना दिला आहे. अधिकाऱ्यांना तहलीदारांकडून आदेश मिळाल्यानंतर त्याचे पालन होत नसल्याने लताबाई यांनी हा निर्णय घेतला आहे.
लताबाई हिंगे यांनी केलेल्या या मागणीवर तहसीलदार कार्यालयाकडून काय उत्तर येते? हे आता पाहावे लागणार आहे. या प्रकाराची चर्चा परिसरात सुरु झाली आहे.