पावसाचा हाहा:कार, अजितदादांनी पुण्यात थेट आर्मी उतरवली, NDRF चे 40 जवानही तैनात
पुण्यात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत बचाव कार्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अजित पवार या पूर परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत. तसेच ते युद्ध पातळीवर बचाव कार्यासाठी काम करत आहेत.
पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हाहा:कार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यातील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाकडून कशाप्रकारे बचावकार्य सुरु आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे. या आढावानंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. “सगळ्या धरणांचे जिथे कॅनाल आहेत ते सोडायला सांगितले आहेत. पाऊस आटोक्यात आला आहे. पण नागरिकांना विनंती आहे घाबरु नका. पुण्यात सिंहगड रोड भागात आर्मी तैनात करण्यात आली आहे. एनडीआरएफचे ४० लोकं तैनात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुद्धा या परिस्थितीवर लक्ष आहे”, असं अजित पवारांनी सांगितलं.
“कोणाला फूड पॉयजनिंग होऊ नये याची दक्षता घेतली गेली आहे. मुळशी धरण सुद्धा भरले आहे. तिथे वीज निर्मितीसाठी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अलर्ट राहायला सांगितलं आहे. सिंहगड रोडमध्ये आर्मीची एक तुकडी आणि एक एनडीआरएफची टीम तैनात आहे”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
‘2 दिवस तिथे जाऊ नका’, अजित पवार यांचं आवाहन
“धबधबे पाहण्यासाठी लोकांना उत्साह असतो. पण त्यांना माझं आवाहन आहे की, 2 दिवस तिथे जाऊ नका. लवासामध्ये वरचा मलबा पडला आहे. तिथले रस्ते वाहून गेले आहेत. तिथे पीडब्ल्यूडीचे लोकं चालली आहेत. जर कोणी अडकले असेल तर आमचे प्रयत्न सुरू आहेत”, असं अजित पवारांनी सांगितलं. “अनाधिकृत वीज घेतली होती असा अंदाज आहे म्हणून पुण्यातील ३ जणांचा डेक्कन भागात त्यांचा मृत्यू झाला आहे. जे जखमी झाले आहेत त्यांचा खर्च शासन आणि महापालिका करेल”, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
“नैसर्गिक संकट आलं की विरोधक काय आरोप करतात त्यावर लक्ष द्यायचं नाही. कोणी काही बोलले असेल तरी सुद्धा मला काही बोलायचं नाही. यात मला राजकारण करायचं नाही. ज्या सोसायटी टाक्यांमध्ये पाणी शिरले आहे, त्यांना टँकरने पाणी दिले जाईल. पुण्यातील वारजे भागात म्हशी ज्या मृत्युमुखी पडल्या आहेत त्याचे सुद्धा पंचनामे केले जाणार आहेत. शालेय आयुक्त यांच्याशी बोलून १० वी आणि १२ वी पेपर संदर्भात निर्णय घेऊ”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
अजित पवारांचं नागरिकांना मोलाचं आवाहन
राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असेल तरंच घराबाहेर पडावे. नदी, नाले, ओढे, धरण, पूरस्थिती असलेल्या सखल भागात जाणे टाळावे. डोंगर, टेकड्या, दऱ्या, धबधब्यांसारख्या ठिकाणी पुराचे पाणी अचानक वाढणे, निसरड्या वाटेवर पाय घसरुन अपघात होण्यासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी सद्यस्थितीत पर्यटनासाठी बाहेर पडू नये, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
दरडप्रवण, पूरग्रस्त, सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. प्रशासनाच्या संपर्कात रहावे आणि त्यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना, आवाहनांचे पालन करावे. स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
अजित पवार बचाव कार्यात सक्रिय
पुण्यात काल रात्रीपासून प्रचंड पाऊस पडतोय. रात्रभर पडलेल्या पावसामुळे नदीकाठचा परिसर तसेच सिंह रोड भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुण्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोरदार फटका बसला आहे. एका ठिकाणी पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यावर ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्तीच्या काळात अजित पवार हे प्रचंड सक्रिय झाले आहेत. अजित पवार यांचं पुण्यावरचं प्रेम याआधीदेखील अनेकदा बघायला मिळालं आहे. पुणे संकटात असल्याचं लक्षात आल्यानंतर अजित पवार हे राजधानी मुबंईहून पुण्याच्या दिशेला रवाना झाले.
अजित पवार यांनी आधी पुण्यातील पावसाचा आढावा घेतला. यानंतर ते तातडीने पुण्याच्या दिशेला गेले. त्यांनी स्थानिक पातळीवर जावून परिस्थितीची पाहणी केली. अनेकांना मदतीचा हात दिला. यानंतर अजित पवार हे पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत मिळावी यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. एवढंच नाही तर आवश्यक असल्यास नागरिकांचं स्थलांतर असेल किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टींसाठी पोलिसांनी सर्वोतोपरी मदत करावी या हेतूने त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांची देखील भेट घेतली आहे. अजित पवार सातत्याने पुण्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. फक्त लक्ष ठेवून नाही तर ते स्वत: बचाव कार्यसाठी ग्राउंड लेव्हलवर सक्रिय आहेत.
सतेज पाटील यांनी घेतली कर्नाटकचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट
कोल्हापूरचे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची भेट घेतली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना अलमट्टी धरणातून सोडलेल्या पाण्याचा मोठा फटका बसतोय. त्यामुळे सतेज पाटील यांनी पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीबाबत दोघांशी चर्चा केली. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अलमट्टी धरणातून पाणी नियंत्रणात सोडण्याची विनंती केली. डी के शिवकुमार यांनी अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची सतेज पाटील यांनी माहिती दिली.