Pune Ganesh Utsav : गणेशोत्सवासाठी नियमावली, मंडपाची उंची किती असावी, कमान किती उंच असणार
Pune Ganesh Utsav 2023 : गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. मंडळांकडून तयारी सुरु असताना प्रशासनाने नियमावली जाहीर केली आहे. त्यात मंडपाची उंची किती ठेवावी, यासंदर्भातील नियम जाहीर केले आहे. यंदा परवान्यासाठी काही शुल्क असणार आहे का?
पुणे | 2 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील गणेशोत्सव देशात प्रसिद्ध आहे. देशविदेशातून भाविक पुण्यात गणेशोत्सवासाठी येतात. पुणे प्रशासनाकडून गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता मागील वर्षापासून पुढील पाच वर्षांसाठी उत्सव मंडप, स्वागत कमानी, मंडपासाठी दिलेल्या परवानगी ग्राह्य धरणार आहेत. तसेच परवान्यांसाठी पुणे महापालिकेतर्फे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. गणरायाच्या स्थापनेसाठी उभारण्यात येणाऱ्या उत्सव मंडपाची उंची ४० फुटांपेक्षा नसावी, ४० फुटापेक्षा उंच मंडप असल्यास अधिकृत स्थापत्य अभियंता यांचे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट जोडावे लागणार आहे.
दहावीची पुरवणी परीक्षा, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीला संधी
दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल लागला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची संधी आहे. पाचव्या विशेष फेरीत त्यांना त्यासाठी अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी ४ ते ८ सप्टेंबरची मुदत दिली आहे. त्यानंतर ११ सप्टेंबरला गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना ११ ते १५ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत दिली आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश
शिरुर तालुक्यातील मूग आणि उडीद पीकाकरिता नुकसान भरपाई देण्याचे आदेश जारी केले आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२३ योजनेअंतर्गत ही भरपाई मिळणार आहे. मूग आणि उडीद पिकाकरीता संभाव्य विमा नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहे.
जालना लाठीचार्ज, संभाजी ब्रिगेडची टीका
मराठ्यांच्या जीवावर जगता आणि मराठ्यांवरच लाठी चार्ज करणारे हे सरकार आरक्षण विरोधी आहे. संघाच्या लोकांना आरक्षण नको आहे. यामुळेच आरक्षणाचा खेळ खंडोबा सुरू आहे. जालना शहरामध्ये झालेल्या लाठीचार्ज घटनेचा जाहीर निषेध संभाजी ब्रिगेडने केला आहे.
पुणे शहरात जोरदार पाऊस सुरु
पुणे शहरात शनिवारी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारली होती. त्यानंतर मोठ्या ब्रेकनंतर आता पाऊस सुरु झाला आहे. त्याचवेळी आज पुणे शहरातील पाणी कपातीसंदर्भात बैठक होत आहे. त्यात धरणसाठ्यांची परिस्थिती पाहून पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येणार आहे.