घराबाहेर गणपती मूर्ती बसवली, गृह निर्माण सोसायटीने केला दंड, आता पुणेरी प्रकरण न्यायालयात
Pune News : पुणे तेथे काय उणे, असे नेहमी म्हटले जाते. पुणेरी हे भांडण वेगळया प्रकारचे आहे. घराच्या बाहेर गणपतीची मूर्ती ठेवल्यावरुन झालेला हा प्रकार आहे. त्या घरमालकास सोसायटीने लाखोंचा दंड केला आहे.
रणजित जाधव, पुणे | 17 जुलै 2023 : पुणे शहरातील एका भांडणाची चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहे. हे भांडण गृहनिर्माण सोसायटी अन् त्या ठिकाणी सदस्यांमधील आहे. गृहनिर्माण सोसायटीत असलेल्या फ्लॅटच्या बाहेर गणपतीची मूर्ती ठेवली. मग सोसायटीमधील संचालकांनी त्यांना दंड केला आहे. हा दंडही 5 लाख 62 हजार रुपयांचा आहे. आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्याठिकाणी कोणाच्या बाजूने निकाल येईल, याकडे लक्ष लागले आहे. ही सोसायटी २००५ साली रजिस्टर झाली. त्यानंतर तब्बल वीस वर्षानंतर या दाम्पत्याला दंड ठोठावला आहे.
काय आहे प्रकार
पुणे शहरातील वानवडी भागात संध्या आणि सतीश होनावर हे दांपत्य राहतात. 2002 मध्ये त्यांनी वानवडी भागात असलेल्या फ्लावर व्हॅली सोसायटीमध्ये फ्लॅट घेतला. त्यानंतर घरी वास्तुशांती केली. विधिवत पूजा करून गणरायाची मूर्ती दरवाज्याच्या बाहेर ठेवली. ही मूर्ती कागदापासून बनविलेली आहे. मूर्ती सुमारे तीन ते साडेतीन फुटांची आहे. ही मूर्ती घराबाहेर ठेवल्यामुळे सोसायटीने त्यांना नोटीस पाठवली. त्यानंतर दोनावर दांपत्याला दंड केला. हा दंड 5 लाख 62 हजार रुपयांचा आहे.
का केला दंड
सोसायटीचे सचिव कल्याण रामायण यांनी सांगितले की, फ्लॅटधारकांनी कुठलीही वस्तू घराच्या बाहेर ठेवू नये. अशी वस्तू घराबाहेर असल्यास महिन्याच्या कराच्या पाच पट रक्कम दंड म्हणून आकारण्यात येते. यासंदर्भात होनावर यांना 2019 मध्ये नोटीस पाठवली. घराबाहेर बसविलेली गणपती बाप्पाची मूर्ती काढून टाका, असे तेव्हा त्यांना सांगितले होते. परंतु त्यांनी काढली नाही.
कल्याण रामायण म्हणाले की, आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. आम्ही देखील गणपती बाप्पाचे भक्त आहोत. परंतु सोसायटीच्या परिसरात काहीच ठेऊ नये, असा निर्णय सोसायटीने घेतलेला आहे. त्यामुळे त्याचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे
न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
दरम्यान सोसायटीने दंड केल्यानंतर होनावर दांपत्य न्यायालयात गेले आहे. आता या प्रकरणावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच हा निर्णय सर्व गृहनिर्माण सोसायट्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. यामुळे राज्यभरातील गृहनिर्माण सोसायट्यांचे लक्ष याकडे लागले आहे.