पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट, ‘मी शांत बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करणार’, आरोपी डॉ. अजय तावरे यांचा मोठा इशारा
पुणे हिट अँड रन प्रकरणी आता मोठा ट्विस्ट आला आहे. कारण ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे यांनी पोलीस तपासात मोठा इशारा दिला आहे. अजय तावरे यांना अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 'मी शांत बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करणार', असा इशारा अजय तावरे यांनी पोलीस तपासात दिल्याची माहिती समोर येत आहे.
पुणे हिट अँड रन प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी अलनोर यांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. “मी शांत बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करणार”, असा मोठा इशारा डॉ. अजय तावरे यांनी पोलीस तपासात दिला आहे. डॉ. अजय तावरेला पहाटे अटक केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याची कसून चौकशी केली. ब्लड सॅम्पलमध्ये बदल केल्याप्रकरणी डॉ. तावरे आणि डॉ. हळनोर यांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींच्या तपासात आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे.
आरोपींना अटक केल्यानंतर आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने तीन आरोपींना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आरोपींचे वकील ऋषीकेश गानू आणि जितेंद्र सावंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “जी कलम लावण्यात आली आहेत, ती लागू होतात का? यावर न्यायालयात युक्तिवाद झाला. जी कारणं पोलीस कोठडीसाठी देण्यात आली आहेत, त्यांची प्रत्यक्षात गरज नव्हती. आरोपींच्या पोलीस कोठडीची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया आरोपींचे वकील ऋषीकेश गानू यांनी दिली.
अजय तावरे यांच्या वकिलांचा नेमका दावा काय?
अजय तावरे यांचे वकील जितेंद्र सावंत यांनीदेखील माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “ब्लड सॅम्पलममध्ये छेडछाड केली हा आरोप आहे. आरोपी त्यावेळी सुट्टीवर होते. त्यामुळे त्यांचा या आरोपात सहभाग नव्हता. जी कलम लावण्यात आली आहेत, ते बेलेबल होती. पोलिसांकडून जाणूनबुजून कलमे लावण्यात आली आहेत. अजय तावरे हे 20 दिवसांपासून सुट्टीवर होते. लोकसेवकाच्या सांगण्यावरून ब्लड सॅम्पलमध्ये बदल केला असा आरोप पोलिसांचा होता”, अशी प्रतिक्रिया अजय तावरे यांच्या वकिलांनी दिली.
वरिष्ठ अधिकारी आरोपींची एकत्रित चौकशी करणार
दरम्यान, गुन्हे शाखा चार कार्यालयात विशाल अग्रवाल आणि अजय तावरे यांची एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे. आरोपी विशाल अग्रवाल, अजय तावरे, श्रीहरी हळनोर, अतुल घटकांबळे यांची वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार आहेत. या सर्व आरोपींची एकत्रित चौकशी होणार आहे. ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी अग्रवाल यांनी या तिघांना पैसे दिल्याचे आरोप आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक एकत्रितपणे चौकशी करणार आहेत.